1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 2 एप्रिल 2023 (19:41 IST)

खान्देशपुत्र संगीतकार तथा उपयुक्त संजय महाले यांचा मुंबई गौरव

दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनतर्फे गौरव, नोकरी करीत असतांना जोपासली संगिताची कला
 
अमळनेर : येथील मुळ रहिवासी व बृहन्मुंबई महापालिकेचे उपायुक्त उल्हास (संजय) महाले यांनी शासकीय सेवा बजावत असताना छंद म्हणून संगीत विषयक आवड जोपासली. संगीत क्षेत्रात तब्बल वीस वर्षांहून अधिक दिलेल्या योगदानाची दखल घेत महाले यांना संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनचे उपाध्यक्ष तथा चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर तसेच नातसून मृदुला पुसाळकर यांच्या हस्ते उपायुक्त उल्हास (संजय) महाले यांना सन्मानपत्र, तैलचित्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध संगीतकार तथा गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर आणि बृहन्मुंबई मनपातील अधिकारी उपस्थित होते.
 
सन्मान सोहळ्याप्रसंगी चंद्रशेखर पुसाळकर म्हणाले की, महाले यांनी महानगरपालिकेत सेवा पत्करली असली तरी त्यांनी आपली संगीत क्षेत्रातील आवड, छंद फक्त जपली नाही तर ती विकसित केली. वीस वर्षांहून अधिक काळ वेगवेगळ्या भूमिकांमधून महाले यांनी संगीत क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. संगीत आणि साहित्य क्षेत्रातील श्री. महाले यांचा अभ्यास अतिशय गाढा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिके सारख्या अतिशय मोठ्या संस्थेत सेवा बजावताना संगीत क्षेत्रात देखील त्यांनी तितक्याच तन्मयतेने योगदान दिले आहे. अशी उदाहरणे अतिशय दुर्मिळ असल्याचे पुसाळकर यांनी सांगितले.
 
दुसर्‍यांदा पुरस्कार मिळाल्याचे भाग्य लाभले.
संगीत ही आवड स्विकारले, ताणतणावातून मुक्ती देणारे संगीत व्यापक व्यासपीठावर नेवून, त्या आधारे इतरांना शक्य होईल तेवढी संधी देत या क्षेत्रात वावरतो आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून कर्तव्य बजावताना जसे जसे शक्य झाले.तसा तसा वेळ काढून संगीत, दिग्दर्शन, सांगीतिक कार्यक्रम, लघुकथा दिग्दर्शन, पटकथा आदी भूमिका बजावल्या. आतापर्यत शंभराहून अधिक गझल, कविता लिहिल्या आहेत. त्यासाठी कुटुंबाची साथ मिळाली म्हणून संगीत व चित्रपट सृष्टीतील अनेक लहान मोठ्या व्यक्तींसोबत काम करता येणे शक्य झाले. यापूर्वी आरसा या लघुपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. आज पुन्हा चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने दुसर्‍यांदा पुरस्कार मिळाल्याचे भाग्य लाभले. असे मत पुरस्कार स्विकारतांना उपायुक्त उल्हास (संजय) महाले यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. सलील कुलकर्णी, जयदीप बगवाडकर, केतकी भावे-जोशी यांनी एकाहून एक सुरेल गीत सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर सुत्रसंचालन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, गायिका गौतमी देशपांडे यांनी केले. उपायुक्त संजय महाले यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण अमळनेर येथे झाले आहे. ते श्री मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे ते लहान बंधू आहेत.