नितीन गडकरी यांच्या विरोधातील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फटकारले
मुंबई उच्च न्यायालयाने मेटा, एक्स आणि गूगल यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात सोशल मीडिया आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत असलेल्या कथित आक्षेपार्ह मजकुराविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. अंतरिम दिलासा देताना, न्यायालयाने मेटा, एक्स कॉर्प आणि गूगल एलएलसी यांना गडकरी यांच्याशी संबंधित कथित बदनामीकारक, अश्लील, अपमानजनक आणि द्वेषपूर्ण पोस्ट तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले.
न्यायालयाने स्पष्ट केले की, भविष्यात नितीन गडकरी यांच्याशी संबंधित कोणतेही कथित डीपफेक किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून तयार केलेली आक्षेपार्ह सामग्री ऑनलाइन अपलोड झाल्यास, गडकरी संबंधित प्लॅटफॉर्मला कळवून कारवाईची मागणी करू शकतात. त्यानंतर संबंधित ऑनलाइन प्लॅटफॉर्मना आवश्यक ती पावले उचलणे बंधनकारक असेल.
उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर निश्चित केली आहे. तोपर्यंत, सर्व प्रतिवादींना नितीन गडकरी यांच्या याचिकेवर त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
Edited By- Dhanashri Naik

