सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 15 जून 2020 (09:00 IST)

मुंबईत आजपासून धावणार लोकल, केवळ या लोकांना प्रवासाची परवानगी

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून लोकल पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उपनगरीय लोकल 15 जून पासून धावणार आहेत. मात्र सर्वसामान्य प्रवासी या लोकलने प्रवास करू शकणार नाहीत. 
 
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते डहाणू रोड या मार्गावर 146 उपनगरीय फेऱ्या धावणार आहेत. सकाळी 5.30 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत सरासरी 15 मिनिटांनी लोकल सेवा सुरू असेल.
 
बहुतांश लोकल या चर्चगेट ते विरार या दरम्यान धावणार आहे. या लोकल चर्चगेट ते बोरीवली दरम्यान जलद तर त्यापुढे धीम्या गतीने धावतील. विरार ते डहाणू या मार्गावर 16 लोकल तर मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन अशा 200 फेऱ्या सुरू होणार आहेत. 
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे या मार्गांवर 130 लोकल फेऱ्या होतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावर 70 फेऱ्या होतील. कार्यालयीन वेळांप्रमाणे सकाळी 7, 9, दुपारी 3 सायंकाळी 6, रात्री 9, 11 याप्रमाणे गाड्या चालविण्यात येतील.
 
अत्यावश्यक सेवेतील सुमारे 1.25 लाख कर्मचारी या सेवेचा लाभ घेऊ शकतील.