बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (11:46 IST)

व्हॅलेंटाईन वीकमध्ये मुंबईत प्रियकराने प्रेयसीला पेटवले तर तिने मारली मिठी

प्रेमाची बहर येणार्‍या व्हॅलेंटाईन विक मध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. तर पेटल्यावर प्रेयसीने प्रियकराला मिठी मारली. या घटनेत प्रियकराचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय विजय खांबे याचे आपल्या मेव्हण्याच्या धाकड्या बहिणीशी गेल्या अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याला मुलीशी लग्न करायचे होते पण त्याला दारुचे व्यसन असल्यामुळे कुटुंबातील लोकांना हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. पण विजयने लग्नासाठी हठ्ठ धरला असून तो तिला त्रास देत होता. त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि आठवडाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ती घरी आली असताना विजय पुन्हा तिला भेटण्यासाठी गेला होता. 
 
पीडिता घरी एकटी असताना विजयने संधी साधून घरात प्रवेश केला आणि त्यांच्यात वाद झाला. विजय आपल्यासोबत पेट्रोलची बाटली घेऊन आला होता. त्याने पीडितेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवले. तरुणी ओराडाओरड करत होती तेव्हा विजय फक्त उभे राहून बघत होता तेव्हा तरुणीने विजयला मिठी मारली. विजय स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाही तिने त्याला सोडले नाही. दोघेही घराबाहेर येऊन कोसळले.
 
दोघांना या अवस्थेत बघून शेजाऱ्यांनी धाव घेत आग विझवली आणि त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीत होरपळून विजय 90 टक्के भाजला होता त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूशी झुंज देत आहे.
 
मुंबईतील जोगेश्ववरी भागातील मेघवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गांधीनगर परिसरात ही थरकाप उडवणारी घटना घडली असून विजय खांबे विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.