३७० रुपयांच्या बिर्याणीवरून झालेला वाद आणि मुंबई पोलिसांचा इशारा, प्रणित मोरेच्या शोमध्ये नक्की काय घडले?
स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे आणि ३७० रुपयांच्या बिर्याणीचा वाद सध्या चांगलाच गाजत आहे. आता या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांनीही उडी घेतली असून, सोशल मीडियाद्वारे त्यांनी एक कडक आणि सूचक इशारा दिला आहे.
नक्की काय आहे हा '३७० रुपयांच्या बिर्याणी'चा वाद?
कॉमेडियन प्रणित मोरे याच्या एका शोमधील 'क्राउड-वर्क' (प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा भाग) चा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेल्या 'हिमांशु जांगडा' नावाच्या एका वेब डेव्हलपरने एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्याने सांगितले की, "तो एका मुलीला डेटवर घेऊन गेला होता आणि तिथे त्याने चिकन बिर्याणीवर ३७० रुपये खर्च केले." यानंतर त्याने पुढे अशी आक्षेपार्ह टिप्पणी केली की, "मी खाण्यावर पैसे खर्च केले असल्यामुळे मला तिच्याकडून शारीरिक संबंधांची अपेक्षा होती."
या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला गेला. युजर्सनी या मानसिकतेचा तीव्र निषेध केला. महिलांचा सन्मान आणि त्यांच्या संमतीला अशा प्रकारे पैशांच्या देवाणघेवाणीशी जोडणे अत्यंत चुकीचे आणि गंभीर असल्याचे मत लोकांनी मांडले.
कॉमेडियन प्रणित मोरेवरही टीका
केवळ त्या प्रेक्षकावरच नाही, तर कॉमेडियन प्रणित मोरे याच्यावरही जोरदार टीका झाली. शो दरम्यान अशा आक्षेपार्ह कमेंटवर आक्षेप न घेता, प्रणितने केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धी मिळवण्यासाठी तो व्हिडिओ इंटरनेटवर पोस्ट केला, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला.
या वादानंतर घडलेल्या घडामोडी
वाद वाढल्यानंतर प्रणित मोरेने इन्स्टाग्रामवर जाहीर माफी मागितली आणि त्या कमेंटवर तिथेच आक्षेप घ्यायला हवा होता, असे मान्य केले. या वादानंतर प्रणितने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट डीएक्टिव्हेट केले आहे.
वृत्तांनुसार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हिमांशु जांगडाला या घटनेनंतर त्याच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
????Its your choice
— मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) June 10, 2026
????निवड तुमची आहे!#BiryaniIsNotConsent pic.twitter.com/VtxXw7ehQt
मुंबई पोलिसांची एन्ट्री आणि हटके पोस्ट
आपल्या अनोख्या आणि कल्पक सोशल मीडिया पोस्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांनी या वादाची दखल घेत एक पोस्ट शेअर केली. त्यांनी एका पांढऱ्या बॅकग्राउंडवर मोठ्या अक्षरात '₹370' लिहिले आणि त्यातील '0' च्या जागी बिर्याणीच्या प्लेटचे चित्र ठेवले.
या फोटोवर मुंबई पोलिसांनी लिहिले
"३७० रुपयांमध्ये तुम्हाला बिर्याणीची एक प्लेट मिळते. पण आमच्या लॉक-अपमध्ये जास्त वेळ घालवल्यास मोफत जेवण मिळते."
या पोस्टच्या शेवटी पोलिसांनी #BiryaniIsNotConsent हा हॅशटॅग वापरला. कोणत्याही व्यक्तीचे नाव न घेता पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला की— कोणावरही जबरदस्ती करणे किंवा हक्क गाजवणे हा गंभीर गुन्हा आहे. 'नाही' चा अर्थ नेहमी 'नाही' असाच असतो; एखाद्या महिलेवर पैसे खर्च केले म्हणजे तिच्यावर हक्क मिळाला असा होत नाही, असे सांगत पोलिसांनी संमतीचे महत्त्व अधोरेखित केले.
पोलिसांच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. काहींनी पोलिसांच्या या कल्पकतेचे कौतुक केले, तर काहींनी पोलिसांनी अशा ट्रेंडिंग विषयांवर मीम्स बनवू नयेत, असा सल्लाही दिला.
