मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे सेवा विस्कळीत
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून रेल्वेसेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या अंधेरी ते विरार दरम्यान लोकल सेवा सुरू आहेत. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. येत्या २४ तासात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. परंतु संध्याकाळनंतर पावसाचा जोर अचानक वाढला. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरलं. त्यामुळे बेस्टची वाहतुकदेखील अन्य मार्गांवरुन वळवण्यात येत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबईत सकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा परिसरात १२२.२ मिमी आणि सांताक्रुझ येथे २७३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.