मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (15:16 IST)

तर केंद्राच्या नियमानुसार मुंबईत लॉकडाऊन लागेल : पेडणेकर

Mumbai will have lockdown as per central rules: Pednekar
कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. तसेच ओमायक्रॉन रुग्णांची भर पडतच आहे. यापुढे काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्या 20 हजारांच्या पुढे गेल्यास केंद्राच्या नियमानुसार मुंबईत लॉकडाऊन लागेल, असे स्पष्ट संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी  पत्रकार परिषदेत दिले. 
 
मुंबई, पुणे या महागरांमध्ये रूग्ण संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी ऑफलाईन शाळा, महाविद्यालये 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मुंबईतील स्थितीबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली. नागरिकांना कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्यात. जर रूग्ण संख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
 
 मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल हे मुंबईतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आपण जी यंत्रणा उभी केली आहे, त्या यंत्रणेच्या माध्यमातून आजही मग विलगीकरण केंद्र असतील, रूग्णालये, गृह विलगीकरण या सगळ्यांकडे महापालिका म्हणून आमचं लक्ष आहे, असे त्या म्हणाल्या.
 
कोरोना आणि ओमायक्रोनचे वाढते रुग्ण पाहता घाबरायची गरज नाही पण काळजी घेतली पाहिजे. गर्दी टाळली पाहिजे. थोडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, गर्दी टाळली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष ठेवून आहेत. कोरोनाचा धोका वाढल्याने शिवसेनेने दोन कार्यक्रम रद्द केले आहेत. लग्न समारंभ कार्यक्रम आपण स्वतःहुन टाळले पाहिजे. दिलेल्या नियमांत राहून लग्न समारंभ करा, असे त्या म्हणाल्या.
 
महानगरपालिका म्हणून आमचे लक्ष आहे. लॉकडाऊन कोणालाही नको आहे. लॉकडाऊनने कंबरड मोडेल. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे,
मास्क लावा आणि काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दररोज 20 हजारचा आकडा पार झाला तर लॉकडाऊन करावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक दोन दिवसात बोलतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.