मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 25 एप्रिल 2021 (08:53 IST)

मुंबईत आता घरोघरी जाऊन तपासणी होणार, नव्या मोहिमेसाठी १० टीम सज्ज

मुंबईतील कोरोना संसर्ग अद्यापही नियंत्रणात आला नसून मुंबई महापालिकेने  आता कंबर कसली आहे. आता घराघरात जाऊन मुंबई पालिकेकडून तपासणी करण्यात येणार असून यासाठी १० रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. या १० रुग्णवाहिकांमध्ये १० वैद्यकीय टीम कार्यरत असणार आहेत.
 
मुंबईतील लक्षणे असणाऱ्या कोविड बाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णशय्यांचे वाटप हे वैद्यकीय तपासणीनंतरच करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे ही वैद्यकीय तपासणी रुग्णाच्या घरी भेट देऊन अर्थात गृहभेटीद्वारे केली जाणार आहे. गृहभेटीद्वारे करण्यात येणाऱ्या या वैद्यकीय तपासण्यांचे समन्वयन हे विभागस्तरीय ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे करण्यात येणार आहे. गृहभेटींद्वारे करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासणींसाठी प्रत्येक विभागाच्या स्तरावर प्रत्येकी किमान 10 तपासणी चमू व या प्रत्येक चमुसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था तात्काळ करवून घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले असून ही व्यवस्था येत्या रविवारपासून अंमलात येणार आहे. यानुसार वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाची गरज लक्षात घेऊन त्याच्या गरजेनुरुप रुग्णशय्येचे वितरण करणे सुलभ होणार आहे.
 
कोविड बाधित रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णशय्यांच्या वाटपाचे समन्वयन हे महापालिकेच्या 24 विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे सुयोग्यप्रकारे करण्यात येत आहे. यामध्ये सामान्य रुग्णशय्या, प्राणवायू पुरवठा सुविधा असणारी रुग्णशय्या (ऑक्सिजन बेड) आणि अतिदक्षता कक्षातील रुग्णशय्या अशा 3 प्रकारच्या रुग्णशय्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
 
कोविड बाधित रुग्णाच्या घरी जाऊन वैद्यकीय तपासणी करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये प्रत्येकी किमान 10 चमू कार्यतत्पर असतील. तर या चमुंना रुग्णांच्या घरी जाणे सुलभ व्हावे, यासाठी प्रत्येक चमुसाठी 1 यानुसार प्रत्येक विभागात 10 रुग्णवाहिका सुसज्ज असतील.
गृहभेटींद्वारे करण्यात येणारी रुग्णांची वैद्यकीय तपासणीची कार्यवाही ही सकाळी 7.०० ते रात्री 11.०० या कालावधी दरम्यान करण्यात येईल. तर रात्री 11.०० ते सकाळी 7.०० या कालावधीमध्ये एखाद्या रुग्णाची वैद्यकीय तपासणी तातडीने करणे गरजेचे असल्यास अशी तपासणी महापालिकेच्या जम्बो कोविड उपचार केंद्रांमध्ये केली जाईल. तथापि, याबाबत देखील आवश्यक ते सर्व समन्वयन हे ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारेच केले जाणार आहे.
गृहभेटींद्वारे वैद्यकीय तपासणी करुन रुग्णशय्या वितरण करण्याची कार्यवाही रविवारपासून म्हणजेच 25 एप्रिल 2021 पासून अंमलात आणण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी बैठकी दरम्यान दिले आहेत. या सुधारित पद्धतीमुळे लक्षणे असणाऱ्या कोविड बाधित रुग्णाला त्याच्या वैद्यकीय गरजेनुसार रुग्णशय्येचे वितरण करण्यात येणार आहे. ज्यामुळे रुग्णशय्या वितरणाचे व्यवस्थापन अधिक सुयोग्यप्रकारे करणे शक्य होणार आहे. 
 
अपवादात्मक संभाव्य परिस्थितीत एखाद्या रुग्णास वैद्यकीय चमुने ज्या प्रकारच्या रुग्णशय्येचे वितरण करण्याचे सुचविले आहे, त्या प्रकारची रुग्णशय्या उपलब्ध नसल्यास अशा रुग्णाला प्रतिक्षा सुचीवर ठेवण्यात येईल व काही तासांनी रुग्णशय्या उपलब्ध झाल्यानंतर रुग्णशय्येचे वितरण करण्यात येईल.
विभागस्तरीय ‘वॉर्ड वॉर रुम’कडे येणाऱ्या दूरध्वनींची संख्या गेल्या काही दिवसात वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक विभागस्तरीय ‘वॉर्ड वॉर रुम’मधील दूरध्वनी क्रमांकाला 30 हंटींग लाईनची सुविधा एम.टी.एन.एल.कडून उपलब्ध करुन घेण्याचे आदेश बैठकी दरम्यान देण्यात आले.