रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जून 2022 (11:22 IST)

मागण्या मान्य ! परिचारिकांचा संप अखेर मागे

covid bed
मुंबई : मागील चार दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांचा संप आज अखेर मागे घेण्यात आला आहे. परिचारिकांच्या मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्याची घोषणा राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष डॉ. मनीषा शिंदे  यांनी केली.
 
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि परिचारिकांचे शिष्टमंडळ यांच्यात मंगळवारी सकारात्मक चर्चा झाल्याने आज संप मागे घेतला आहे. राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष डॉ. मनीषा शिंदे यांनी संप मागे घेण्याबाबत अधिकृत घोषणा केली. तर, पुढील कार्यवाहीसाठी विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ जुलैपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश अमित देशमुख यांनी दिले आहेत, असी माहितीही मनीषा शिंदे यांनी दिली.
 
परिचारिकांची विनंती आधारित बदली करण्यासह पदभरती, पदोन्नती इत्यादी बऱ्याच काळापासून प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांनी २८ मेपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यभरातील हजारो परिचारिका बेमुदत संपावर गेल्याने मुंबईतील जे जे रुग्णालय, जी टी रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयासह राज्यातील सरकारी रुग्णालयांतील रुग्णसेवेवर परिणाम झाला. शिवाय, अनेक शस्त्रक्रियाही रद्द करण्यात आल्या होत्या.