मुंबई शहरातील गरिबांसाठी 'प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची भेट, स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार
मुंबई शहरातील गरजूंना त्यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे.शहरी भागातील गरजवंतांना त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देणे ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रत्येक विभागीय आणि शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञाने सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका बजावावी आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी
काम करण्याचे आवाहन प्रधानमंत्री आवास योजना(शहरी)2.0 चे मोहीम संचालक आणि राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन युनिटचे मुख्य अधिकारी अजित कवडे यांनीं केले आहे.
कोकण विभागासाठी प्रधानमंत्री आवास योजना(शहरी)2.0 शी संबंधित एक कार्यशाळा बीकेसी येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, म्हाडाचे मुख्य अभियंता आडे, वित्त नियंत्रक अजयसिंग पवार, गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रवींद्र खेतले, वरिष्ठ सल्लागार मुकुल बापट आणि विविध शहरांतील तांत्रिक तज्ज्ञ उपस्थित होते.
कवडे यांनी पहिल्या टप्प्याचा प्रगती अहवाल लवकरात लवकर अपलोड करण्याचे आणि जिओ-टॅगिंग करण्याचे निर्देश दिले. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया त्वरित सुरू करून त्यासाठी प्रसिद्धी मोहीम राबविण्याचा सल्ला त्यांनी दिला.
परवडणाऱ्या आणि स्वस्त घरांच्या सुविधांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Edited By - Priya Dixit