मुंबईतील रस्ते, चौक लवकरात लवकर भिकारीमुक्त करावेत
मुंबई पालिकेने रस्त्यावरील भिकाऱ्यांचा बंदोबस्त करून मुंबईतील रस्ते, चौक लवकरात लवकर भिकारीमुक्त करावेत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक कमलेश यादव यांनी उपस्थित केला आहे.
जर पालिकेला भिकाऱ्यांची समस्या सोडविणे जमत नसेल तर त्यांनी भाजपला ती जबाबदारी द्यावी, अशी मागणीही कमलेश यादव यांनी यावेळी केली. भाजप आवश्यक उपाययोजना करून संपूर्ण मुंबईतील भिकाऱ्यांची समस्या आपल्या हिमतीवर सोडवून दाखवेल. फक्त त्याबाबतचे अधिकार पालिकेने आम्हाला द्यावेत, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सन २०२२ – २३ या अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना नगरसेवक कमलेश यादव यांनी वरीलप्रमाणे पालिकेला जाब विचारत व फैलावर घेत मागणी केली आहे. कांदिवली येथील एमजी रोड येथील एका तीन मजली शालेय इमारतीत शाळा बंद करून त्या जागेत बेघर लोकांसाठी आश्रय व निवारा स्थान उभारण्यात आले. तेथे पालिकेने भिकारी, बेघर लोकांसाठी जेवण, पाणी, वीज सर्व प्रकारची व्यवस्था केली. मात्र तरीही तेथील रस्त्यांवर ठिकठिकाणी भिकारी भीक मागताना दिसून येतात. तर काही भिकारी मोबाईल, पैसे यांची चोरी करताना आढळून येत आहेत. त्यामुळे पालिकेने बेघर, भिकारी लोकांसाठी चांगली व्यवस्था केली असूनही व त्यासाठी बऱ्यापैकी निधी खर्चूनही मुंबईत ठिकठिकाणी भिकारी आढळून येत आहेत, अशी खंत नगरसेवक कमलेश यादव यांनी यावेळी व्यक्त केली.