गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जानेवारी 2023 (15:22 IST)

मुंबईत 'स्पेशल २६' स्टाईलने केली लूट

मुंबईतील (Mumbai) झवेरी बाजारातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर बनावट ईडी अधिकाऱ्यांनी छापे टाकून कोटींची लुट केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झवेरी बाजारातील (Zaveri Bazar) एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर ४ अज्ञात व्यक्तींनी छापा टाकला. यावेळी त्यांनी ईडीचे अधिकारी असल्याचे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात २ व्यक्तींना अटक करण्यात आल्याची माहिती मुबई पोलिसांनी दिली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या ४ अज्ञात व्यक्तींनी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला बेड्यादेखील घातल्या. आरोपींनी कार्यालयातून तब्बल २५ लाखांची रोकड आणि अंदाजे ३ किलोचे सोने लुटले. सोन्याची किंमत १ कोटी ७० लाख इतकी होती. पोलिसांनी ४ अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३९४, ५०६ (२) आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दुकानात आणि परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस आरोपींचा शोध घेतला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या एलटी मार्ग पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor