रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (12:56 IST)

मनसेने करोना निर्बंधांचा निषेध म्हणून हंडी फोडली

फोटो: प्रतीकात्मक
करोना निर्बंधांचा निषेध म्हणून ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पहिली दहीहंडी फुटली आहे. ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणारच असे मनसेने सांगितले होते.
 
पोलिस बंदोबस्त असूनही मनसेने ठाणे, मुंबई यासोबत ठिकठिकाणी दहीहंडी उभारून दहीहंड्या फोडल्या. रात्री १२ वाजता मनसेने ठाण्यात दही हंडी फोडली. त्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती परंतू रात्री २ च्या सुमारास त्यांना तात्काळ जामिनावर सुटका देखील झाली आहे. 
 
आज पहाटेच दादरमध्ये मनसेने दहीहंडी फोडून जल्लोष केला. मानखुर्दमध्येही मनसेने दहीहंडी उत्सव साजरा केला. दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर हे काळाचौकी मैदानात आले तर मैदानात मनसे सैनिक मोठ्या प्रमाणावर जमले असून पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. तसेच नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
 
मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी साजरी करणाऱ्या काही मनसेसैनिकांची धरपकड करण्यात आली आहे. त्यांच्यावर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
 
ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला. मनसे विद्यार्थी सेनेने लक्ष्मी पार्क, वर्तकनगर येथे दहीहंडी उभारत चार थराची हंडी फोडली. तर मनसेने नौपाडा येथील कार्यालयासमोर एक थराची हंडी फोडली. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी ही दहीहंडी फोडली. पोलिसांनी घोषणा देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यामुळे परिसरात मोठा जमाव जमला होता. तर या कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.