सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (21:48 IST)

उल्हास नदीची पाणी पातळी वाढली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

river
ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. उल्हास नदीच्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ तालुक्यातील नदी परिसरात तसेच उल्हासनगर व कल्याण तालुक्यातील नदीच्या परिसरात पाणी भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.
 
उल्हास नदीवरील बदलापूर बॅरेजमधील पाणी पातळीची इशारा पातळी १६.५० मीटर इतकी असून आता बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत पाणी पातळी इशारा पातळीच्या वर १७.२० मीटर इतकी झाली आहे. जांभूळ बंधारा येथील नदीची इशारा पातळी १३ मीटर असून सध्या येथे धोका पातळीच्या वर १४.५७ मीटर इतकी पाणी पातळी आहे.
 
कल्याण तालुक्यातील मोहने बंधारा येथे नदीची इशारा पातळी ९ मीटर असून सध्या येथे ०९.३३ मीटर इतकी पाणी पातळी आहे. उल्हास नदीची पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासनाने नदी काठावरील व परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.