रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 18 मार्च 2024 (20:49 IST)

शिवसैनिक सोबत राहिले नसल्याने उद्धव ठाकरेंची पत तेवढीच राहिली, भाषण करण्यासाठी फक्त पाच मिनिटे

शिवाजी महाराज पार्क इथं विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची काल जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही खोचक टोला लगावला आहे. "आमदार, खासदार आणि शिवसैनिक सोबत राहिले नसल्याने उद्धव ठाकरेंची पत तेवढीच राहिली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांना भाषण करण्यासाठी फक्त पाच मिनिटे देण्यात आली," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
 
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, "कालची सभा ही एक फॅमिली गॅदरिंग होतं. सगळे नैराश्य असणारे लोक...कोणी उत्तर प्रदेशातून, कोणी बिहारमधून तर कोणी जम्मू-काश्मिरातून तिथं आलं होतं. ज्या लोकांना तेथील लोकांनी तडीपार केलं आहे ते लोक इथं आले होते. उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत हिंदू बांधवांनो शब्द वापरला नाही. हिंदुहृदयसम्राट म्हणायला आधीच त्यांची जीभ कचरत होती, आता हिंदू बांधवांनो हा शब्दही गाळण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यामुळेच आम्हाला त्यांना सोडावं लागेल," अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.
 
Edited by Ratnadeep Ranshoor