शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जून 2020 (08:38 IST)

मुंबईतील ९५० हून अधिक करोना मृत्यू का दडविण्यात आले ?

आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक करोना मृत्यू का दडविण्यात आले ? इतके अक्षम्य दुर्लक्ष का ? आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार ? असे मोठे गंभीर प्रश्न  माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विषयी एक पत्र लिहिले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात लिहिलं आहे की, “सुमारे ९५० हून अधिक करोना बळी न दाखवता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. 
 
मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. करोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे ४५१ अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड केली. 
 
आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने करोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असे सारेच प्रश्न निर्माण होत आहेत”.“आता ही बाब उघडकीस आल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी एक पत्र शासनाने पाठवले असून, त्यात कोरोनासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी अपडेट करायची आहे, ती तातडीने पाठवा, असे म्हटले आहे. असे करून झालेला प्रकार जाणूनबुजून लपविण्याचा दुबळा प्रयत्न होताना दिसून येतो आहे. याबाबत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.