शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 31 जुलै 2022 (14:20 IST)

12 वर्षाच्या मुलाने यूट्यूब बघून वाईन बनवली आणि मित्राला दिली नंतर ...

wine
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात यूट्यूबवर व्हिडिओ पाहून काम करण्याचा ट्रेंड वाढला आहे. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामाची माहिती नसल्यास, तो त्या कामाबद्दल यूट्यूबवर शोधतो, आणि त्याच्याशी संबंधित व्हिडिओ सहजपणे मिळतात, तर तो ते काम सहजपणे पूर्ण करतो.
 
असेच एक प्रकरण केरळमध्ये समोर आले आहे. जिथे 12 वर्षांच्या मुलाने यूट्यूब व्हिडिओ पाहून वाईन बनवली आणि मित्राला दिली. दारू प्यायल्यानंतर मित्राला अस्वस्थ वाटू लागले आणि उलट्या होऊ लागल्या. यानंतर त्यांना चिरायंकीझू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना शुक्रवारी एका सरकारी शाळेत घडली आणि पोलिसांनी स्वत:हून दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, मद्य प्राशन केलेल्या मुलाला नंतर रुग्णालयातून सोडण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “चौकशीदरम्यान, मुलाने कबूल केले की त्याने त्याच्या पालकांनी खरेदी केलेल्या द्राक्षांचा वापर करून वाईन बनवली होती. त्याने सांगितले की वाइन बनवण्यासाठी त्याने स्पिरीट किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अल्कोहोल वापरला नाही. दारू बनवल्यानंतर त्याने दारू बाटलीत भरुन YouTube व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जमिनीखाली गाडली."
 
पोलिसांनी सांगितले की मुलाच्या आईला माहित होते की तो दारू बनवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु तिने ते गांभीर्याने घेतले नाही. पोलिसांनी मुलाने शाळेत आणलेल्या बाटलीतील दारूचे नमुने गोळा केले आहेत आणि न्यायालयाची परवानगी घेऊन रासायनिक चाचणीसाठी पाठवले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
 
पोलिसांनी सांगितले की, "दारुमध्ये स्पिरिट किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल मिसळले होते की नाही हे शोधण्यासाठी केमिकल तपासणी केली जात आहे. जर असे काही आढळले तर आम्हाला बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा लागेल." पोलिसांनी मुलाच्या पालकांना आणि शाळेच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर परिणामांची माहिती दिली आहे.