कोलकाता येथील हॉटेलला लागलेल्या आगीत ९ जण ठार, ६ जण जखमी
कोलकातामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिर्झा गालिब स्ट्रीटवरील एका हॉटेलला भीषण आग लागली, ज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग पहाटे २ वाजल्यानंतर लागली. हॉटेलमधील बहुतेक लोक बांगलादेशच्या सीमावर्ती भागातील रहिवासी होते आणि ते वैद्यकीय उपचारांसाठी कोलकाता येथे आले होते.
पहाटे ३ वाजल्यानंतर घटनास्थळावरून नऊ जणांना वाचवण्यात आले आणि त्यांना कलकत्ता मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल होताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचा आरोप आहे. किमान दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
न्यू मार्केटजवळील एका हॉटेलमध्ये आग लागली. अनेक जण आत अडकले होते. नऊ जणांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले असून, त्या सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एसीमध्ये झालेल्या स्फोटामुळे ही आग लागल्याचा संशय आहे. बातमी मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आपत्ती व्यवस्थापन पथकही घटनास्थळी पोहोचले. हॉटेलमध्ये अनेक पाहुणे उपस्थित होते. त्यापैकी नऊ जणांना वाचवून स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी हॉटेलमधील आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
मंगळवारी दुपारी कोलकाता विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती, परंतु अग्निशमन दलाच्या आणि विमानतळ अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, आग लागल्यानंतर हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. हॉटेलमधून अठ्ठावीस जणांना सुखरूप बाहेर काढून कोलकाता येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मृतांमध्ये मेघालय आणि पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथील रहिवाशांचा समावेश आहे. आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही.
Edited By - Priya Dixit