गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (20:54 IST)

पाच महिन्यांचे बाळ अचानक रेल्वेमध्ये दगावले

 children born
मनमाड : पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथून पुण्याला जाणाऱ्या दाम्पत्याचे पाच महिन्यांचे बाळ दगावल्याची मन हेलावून टाकणारी घटना लखनऊ-पुणे एक्स्प्रेसमध्ये घडली. मनमाडला या बाळाचा दफनविधी करण्यात आला.
 
कामाच्या शोधात गोविंद पासवान, सुमन पासवान हे दाम्पत्य पाच महिन्यांच्या बाळासोबत लखनऊ-पुणे एक्सप्रेसने पुण्याला जात होते. गाडीत बसताना बाळ ठणठणीत होते. मात्र गाडी मनमाडला येण्याअगोदर बाळ काहीच हालचाल करत नसल्याचे पाहून पासवान दाम्पत्याने हंबरडा फोडला. गाडी मनमाडला पोहोचल्यानंतर येथे उतरून त्यांनी जवळ असलेल्या दवाखान्यात नेले असता, बाळ दगावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यात ट्रेनमध्ये वाढलेली गर्दी, कडक ऊन आणि उष्मा यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली.
 
अचानक घडलेल्या या घटनेमुळे पासवान दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अनोळखी शहरात बाळाचा अंत्यविधी कसा करावा, असा प्रश्न या दाम्पत्याला पडला होता. यावेळी  सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे मदतीला धावून आले आणि त्यांनी या बाळाचा अंत्यविधी केला. 
Edited by : Ratnadeep Ranshoor