सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जुलै 2023 (20:38 IST)

2 गाड्यांचा अपघात पाहायला ते जमले, तिसऱ्या गाडीनं मागून येऊन 9 जणांना चिरडलं, सर्व ठार झाले

Ahmedabad Accident
Gujarat News : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक भीषण रस्ता अपघात घडला असून गुरुवारी (20 जुलै) पहाटे एका वेगवान कारने रस्ता अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या लोकांना चिरडल्याची घटना घडली आहे.
 
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री एकच्या सुमारास गुजरातच्या अहमदाबाद राज्य महामार्गावरील इस्कॉन मंदिर उड्डाणपुलावर एका डंपरने एसयूव्हीला धडक दिली. त्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला. अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
 
यादरम्यान मागून भरधाव वेगात असलेली जग्वार कार येत होती. निष्काळजीपणामुळे कारने तेथे उभ्या असलेल्या लोकांना चिरडले. यात नऊ जण ठार झाले आहेत, तर 12 जण जखमी झाले.
 
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात पोलिसांनी हे 'हिट अँड रन' प्रकरण असल्याचं म्हटलं आहे.
 
नियंत्रण कक्षामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये गाडीच्या चालकाचाही समावेश आहे.
 
शिवाय स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मृतांमध्ये बोताड आणि सुरेंद्रनगर येथील तरुणांचा समावेश आहे.
 
सोला शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी कृपा पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रात्री दीड वाजता जखमींना रुग्णालयात आणण्यात आलं. सोबतच मृतदेह देखील होते."
 
मिळालेल्या माहितीनुसार, "मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांपैकी चार ते पाच जण 18 - 23 या वयोगटातील असून उर्वरित 35 ते 40 वयोगटातील होते."
 
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे.
 
160 किमी प्रतितास वेगाने ती जग्वार आली आणि...
पोलिस अधिकाऱ्यांनी अपघाताची जागा चिन्हांकित केली असून इस्कॉन उड्डाणपुलाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद असल्याचं अपघात स्थळावरील फोटोंमध्ये दिसत आहे.
 
या घटनेबाबत स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्कॉन उड्डाणपूल ओलांडताना एका डंपरने कारला मागून धडक दिल्याने अपघात घडला. अपघाताच्या आवाजाने रात्री उशिरा लोकांचा जमाव अपघातस्थळी जमला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मागून 160 किमी प्रतितास वेगाने येत असलेली जग्वार कार या जमावावर उलटली.
 
सोला शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी कृपा पटेल यांनी या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.
 
एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना त्यांनी सांगितलं की, "मध्यरात्रीच्या सुमारास जखमींना रुग्णालयात आणण्यात आलं. सोबतच मृतदेहही आणण्यात आले. सुरुवातील चार जखमी आणि तीन मृतदेह आणण्यात आले. त्यापैकी गंभीर अवस्थेत असलेल्या एका रुग्णाचा अर्ध्या तासात मृत्यू झाला."
 
"येथून आणखी एका रुग्णाला आसरा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या या रुग्णालयात कोणावरही उपचार होत नाहीत."
 
मृतांची संख्या आणि त्यानंतरच्या कारवाईबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, "अपघातात मरण पावलेल्या नऊ जणांचे मृतदेह आले आहेत. त्यापैकी एकाचे शवविच्छेदन झाले असून इतरांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे."
 
या घटनेच्या भीषणतेबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितलं, "माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी पहिल्यांदाच इतके मृतदेह एकत्र पाहिले. सर्वजण गंभीर जखमी आहेत."
 
हे मृत 18 ते 40 च्या दरम्यान असावेत अशी माहिती डॉ. पटेल यांनी दिली.
 
आरोपी तात्या पटेलला अटक का झाली नाही?
 
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर अहमदाबाद ट्रॅफिक पोलिसांच्या डीसीपी नीता देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली.
 
नीता देसाई म्हणाल्या, "या घटनेची चौकशी सुरू असून पंचनामाही झाला आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अधिकारी तपासासाठी अपघात स्थळी भेट देतील."
 
त्यांनी पुढे सांगितलं की, तात्या पटेल या जग्वार कारचा चालक असून सध्या त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
आरोपी तात्या पटेलला अटक का झाली नाही? या प्रश्नावर उत्तर देताना नीता देसाई म्हणाल्या, आरोपीच्या दोन-तीन चाचण्या कराव्यात, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्या चाचण्यांच्या निकालानंतर तो सक्षम असल्यास पोलीस त्याला अटक करतील.
 
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोपीला अटक करण्यात येईल, सध्या तो पोलिसांच्या नजरकैदेत असल्याचं त्यांनी सांगितलं.