शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (14:56 IST)

चंद्रयान-3 यशस्वी लँडिंगनंतर चंद्रावर 14 दिवस काय-काय करणार?

भारतीय अंतराळ संस्था इस्रो आजच्या दिवशी (23 ऑगस्ट) इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे.
चंद्रयान-3 आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी जगातील कोणत्याच देशाला या ठिकाणी उपग्रह उतरवण्यात यश आलेलं नाही.
 
14 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून अवकाशात भरारी घेतलेलं हे चंद्रयान-3, 40 दिवसांच्या प्रवासानंतर आज (23 ऑगस्ट) संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ 70 अंश अक्षांशावर उतरण्याचा प्रयत्न करेल.
 
चंद्रयान-2 च्या लँडिंग दरम्यान झालेला तांत्रिक बिघाड लक्षात घेऊन चंद्रयान-3 अधिक कार्यक्षम बनवण्यात आल्याची माहिती इस्रोने दिली आहे.
 
इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, चंद्रयान-2 चं लँडर मॉड्यूल यश मिळेल अशाच पद्धतीने डिझाइन केलं होतं. पण आता त्याच्या अपयशानंतर त्याचं विश्लेषण करून चंद्रयान-3 ची रचना करण्यात आली आहे.
 
याचा अर्थ असा की, मागच्या मोहीमेवेळी जो बिघाड आला होता त्याचं विश्लेषण करून आणि चंद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलमध्ये काय बिघाड होऊ शकतो याचा अंदाज लावून त्याप्रमाणेच त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
 
चंद्रयान-3 मध्ये काय काय आहे?
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-3 साठी प्रामुख्याने तीन उद्दिष्टं निश्चित करण्यात आली आहेत.
 
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचं सॉफ्ट लँडिंग करणं
लँडरमधून रोव्हरला उतरवणं आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरून फिरवणं
लँडर आणि रोव्हरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचं अन्वेषण करणं
 
चंद्रयान-2 मध्ये ज्या तांत्रिक त्रुटी होत्या त्या चंद्रयान 3 मध्ये काढून टाकत लँडर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आला आहे.
 
प्रपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर सात प्रकारच्या उपकरणांनी सुसज्ज आहेत. यामध्ये लँडरवरील चार, रोव्हरवरील दोन आणि प्रोपल्शन मॉड्यूलवरील एक यंंत्राचा समावेश आहे.
 
इस्रोने चंद्रयान-2 मध्ये ऑर्बिटरसह विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे लँडर मॉड्यूलचा भाग म्हणून पाठवले होते.
 
चांद्रयान-2 चं लँडर चंद्रावर कोसळलं, पण ऑर्बिटर जवळपास चार वर्षांपासून चंद्राभोवती फिरत आहे.
 
त्यामुळेच यावेळी इस्रोने चांद्रयान-3 मध्ये फक्त लँडर आणि रोव्हर पाठवले आहेत. म्हणजेच चांद्रयान-3 चा लँडर चांद्रयान-2 सोबत प्रक्षेपित केलेल्या ऑर्बिटरचा वापर पृथ्वीसोबत संवाद साधण्यासाठी करेल.
 
प्रपल्शन मॉड्यूलचे तपशील
17 ऑगस्ट रोजी चंद्रयानाचं लँडर प्रपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करण्यात आले. त्याचे वजन 2145 किलो आहे आणि प्रक्षेपणाच्या वेळी त्यात 1696 किलो इंधन होते.
 
चंद्रयान-3 च्या प्रपल्शन मोड्यूलमध्ये शेप नामक उपकरण देखील जोडण्यात आले आहे. शेप (SHAPE) म्हणजे स्पेक्ट्रो पोलरोमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लेनेटरी अर्थ.
 
हे शेप उपकरण प्रपल्शन मोड्यूलसोबत चंद्राभोवती फिरत राहील आणि इतर दूरच्या ग्रहांचे स्पेक्ट्रोपोलारिमेट्रिक सिग्नलद्वारा निरिक्षण करेल आणि तिथे पृथ्वीसारखे जीवन आहे का याचा शोध घेईल.
 
इस्रोचा अंदाज आहे की हे यान तीन ते सहा महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालेल. हे शेप उपकरण प्रोपल्शन मॉड्युलमध्ये बसवलेल्या एस बँक पॉन्डरवर गोळा केलेली माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्क पर्यंत पोहोचविण्याचं काम करेल.
 
लँडर मॉड्यूलची वैशिष्ट्ये
चंद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलमध्ये लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे.
 
ते दोघेही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरल्यानंतर, त्यांचं आयुष्य केवळ एका दिवसाचं असेल. म्हणजे चंद्रावरील एक दिवसात त्याचं संशोधन केलं जाईल.
 
चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. (चंद्रावर एक दिवस आणि एक रात्र असं चक्र पूर्ण होण्यासाठी पृथ्वीवरचे 28 दिवस लागतात. )
 
चंद्रयान-3 चे लँडर दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद, एक मीटर 116 सेमी उंच आणि 1749 किलो वजनाचे आहे.
 
चंद्रयान-3 च्या दळणवळणात लँडर महत्त्वाची भूमिका बजावेल कारण हे लँडर रोव्हर सोबतच चंद्रयान-2 वेळी प्रक्षेपित केलेल्या ऑर्बिटरशी देखील संवाद साधेल.
 
याशिवाय, तो बंगळुरूजवळील बेलालू येथील भारतीय डीप स्पेस नेटवर्कशी थेट संवाद साधेल.
 
चंद्रयान 1 आणि मंगळयान सारख्या अंतराळ मोहिमेदरम्यानही नेटवर्कचा वापर संपर्कासाठी करण्यात आला होता.
 
चंद्रयान 3 ची विशेष उपकरणे
 
इस्रोने लँडर मॉड्यूलमध्ये महत्त्वाचे पेलोड लावले आहेत. यापैकी एक म्हणजे रेडिओ ऍनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर अँड अॅटमॉस्फियर. थोडक्यात सांगायचं तर रंभा. (RAMBHA)
 
हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा घनतेची तपासणी करेल. तिथल्या आयन आणि इलेक्ट्रॉन्सची पातळी आणि काळानुसार त्यात होणारे बदल यांचा अभ्यास करून माहिती गोळा करेल.
 
लँडरमध्ये बसवलेलं हे महत्त्वाचं उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील गुणधर्मांचा अभ्यास करेल.
 
लँडरमध्ये बसवलेलं हे एक प्रमुख उपकरण आहे. ज्याला आयएलएसए म्हणजेच इंस्ट्रुमेंट फॉर लूनार सिस्मिक एक्टिविटी असं म्हणतात.
 
हे उपकरण चंद्रयान-3 च्या लँडिंग स्थळावर होणाऱ्या भूकंपाच्या हालचालींची तपासणी करेल. चंद्रावर भविष्यात मानवी वस्ती करण्यासाठी हा महत्वाचा शोध असेल.
 
चंद्रावर होणारे भूकंप चंद्राच्या पृष्ठभागावरही होतात. भूकंप ओळखण्यासाठी सेस्मोग्राफरही लँडरवर बसवण्यात आला आहे.
 
भविष्यात चंद्रावर मानवी वसाहती करायच्या असतील, तर आधी तिथल्या भूकंपीय क्रियाकलापांचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे, हे उपकरण चंद्रयान-3 च्या लँडिंग साइटवरील भूकंपाच्या हालचालींचा अभ्यास करेल आणि चंद्राच्या कवच आणि आवरणाची तपासणी करेल.
 
यासोबतच एलआरए नावाचा आणखी एक पेलोड लँडरमध्ये बसवण्यात आला आहे.
 
एलआरएला लेझर रेट्रोरेफ्लेक्टर अॅरे असं म्हणतात. हे उपकरण चंद्राच्या गतिशीलतेची तपासणी करते.
या उपकरणांना चालवण्यासाठी वीज लागते. चंद्रयान-3 मध्ये बॅटरीसोबतच वीज निर्मितीसाठी सोलर पॅनेल लावण्यात आलेत.
 
जर लँडर सूर्यप्रकाशाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने उतरला तरी कोणतीही अडचण येणार नाही कारण लँडरच्या तीन बाजूंना सोलर पॅनेल आहेत. चौथ्या बाजूने रोव्हर सुरक्षितपणे बाहेर येण्यासाठी रॅम्प बसवण्यात आला आहे.
 
रोव्हर मॉड्यूलचं काम
चंद्रावर लँडरच्या सॉफ्ट लँडिंगनंतर, रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि संशोधन करण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.
 
चांद्रयान-3 च्या रोव्हरचं वजन फक्त 26 किलो आहे. त्याला सहा चाकं असून वीज निर्मितीसाठी सोलर पॅनेलसह बॅटरीचाही समावेश आहे.
 
91.7 सेमी लांब, 75 सेमी रुंद आणि 39.7 सेमी उंच असलेलं हे रोव्हर त्याच्या सहा चाकांच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर फेरी मारेल. त्याच्या लहान आकारामुळे आणि इतर गोष्टींमुळे, रोव्हर फक्त लँडरशीच संवाद साधू शकतो.
 
याचा अर्थ की रोव्हरने जर लँडरला गोळा केलेली माहिती पाठवली तरच लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल.
 
रोव्हरमध्ये दोन प्रमुख उपकरणे आहेत.
त्यापैकी पहिलं आहे एलआयबीएस म्हणजेच लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप. हे मुख्य उपकरण आहे. एखाद्या ठिकाणचे घटक आणि त्यांचे गुणधर्म ओळखण्यासाठी वापरली जाणारी ही एक अत्याधुनिक पद्धत आहे.
 
हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर अतिशय तीव्र लेसर प्रकाश टाकेल.
 
त्यामुळे पृष्ठभागावरील माती वितळून प्रकाश उत्सर्जित होईल. त्याच्या तरंगलांबीचे विश्लेषण करून, एलआयबीएस पृष्ठभागावर असणाऱ्या रासायनिक घटकांची ओळख पटवेल.
 
रोव्हरवर बसवलेले हे एलआयबीएस उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह या घटकांचा शोध घेण्यात मदत करेल.
 
चंद्रावरील या मोहिमांमध्ये हे सर्वात महत्त्वाचं संशोधन आहे.
 
एलआयबीएस चंद्राच्या पृष्ठभागावर 14 दिवस घालवेल आणि विविध ठिकाणी विश्लेषित केलेली माहिती लँडरला पाठवेल. लँडर ही माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. या माहितीचे विश्लेषण करून इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या घटकांची माहिती मिळवेल.
 
रोव्हरवर बसवलेलं दुसरं उपकरण आहे एपीएक्सएस म्हणजेच अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर. हे चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले रासायनिक संयुगे शोधून काढेल.
यामुळे चंद्राच्या भूपृष्ठाबद्दल आणि मातीबद्दलची आपली समज वाढेल. त्यामुळे भविष्यातील प्रयोगांना अधिक वेग मिळेल.

नासाने मंगळावर पाठवलेल्या क्युरिऑसिटीसारख्या रोव्हरमध्येही असंच उपकरण बसवण्यात आलं होतं.
 



Published By- Priya Dixit