'लाईव्ह लोकेशन' शेअर करून घडवून आणली पतीची हत्या; सीसीटीव्ही फुटेजने उघड केला पत्नीचा काळा चेहरा
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या धक्क्यातून लोक सावरत असतानाच, आंध्र प्रदेशातील चित्तूरमधून आणखी एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. येथे एका पत्नीने आपल्या निष्पाप मुलीच्या डोळ्यादेखत पतीची निर्घृण हत्या घडवून आणत अनैतिकतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. या खळबळजनक गुन्ह्यामागील कट-कारस्थानाची माहिती मिळताच पोलीसही अवाक झाले.
हसिनीचा कुटिल कट
मृत व्यक्तीची ओळख २३ वर्षीय रमेश अशी पटली आहे, जो एका खाजगी कंपनीत कर्मचारी होता. रमेशचे लग्न १९ वर्षीय हसिनीशी दोन वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना एक लहान मुलगीही होती. मात्र, हसिनीच्या मनात पतीसाठी कोणतेही स्थान नव्हते; त्याऐवजी तिचे २० वर्षीय प्रियकर युगंधरवर प्रेम होते. लग्नानंतरही त्यांचे अनैतिक संबंध सुरूच राहिले आणि रमेशला आपल्या आयुष्यातून कायमचे दूर करण्यासाठी हसिनीने एक कुटिल कट रचला.
'लाइव्ह लोकेशन' शेअर केल्यानंतर पतीची हत्या
आपला कट अंमलात आणण्यासाठी, हसिनीने गोड बोलून पती रमेशला गुडुपल्ले मंडलातील श्री मल्लेश्वर स्वामी मंदिरात जाण्यास राजी केले. रमेश आपली पत्नी आणि मुलीसह दुचाकीवरून निघाला. रमेशला धोक्याची पुसटशीही कल्पना नव्हती आणि तो गाडी चालवत असताना हसिनी प्रवासादरम्यान सतत तिचे 'लाइव्ह लोकेशन' प्रियकर युगंधरला पाठवत होती. युगंधर आणि त्याने भाड्याने आणलेले मारेकरी त्या लोकेशनचा सतत मागोवा घेत होते.
मल्लाप्पा कोंडाजवळील एका निर्जन भागात पोहोचल्यावर, कटाचा भाग म्हणून हसिनीने तिची पर्स खाली पाडली. रमेशने गाडी थांबवताच, झुडपांमध्ये लपून बसलेले युगंधर आणि त्याचा साथीदार धारदार शस्त्रे घेऊन बाहेर आले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रमेश पत्नी आणि मुलीच्या समोरच सुमारे १०० मीटर धावला, परंतु निर्दयी मारेकऱ्यांनी त्याला घेरले आणि धारदार शस्त्रांनी भोसकून त्याची हत्या केली. या रक्तरंजित प्रसंगादरम्यान तिची निष्पाप मुलगीही तिथे उपस्थित होती.
सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर आले
हसिनीची मुलगी आणि नात बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांकडे केल्यानंतर या गूढ हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी तपास सुरू करून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक धक्कादायक सत्य समोर आले. तिथे जाताना रमेश त्याच्या पत्नीसोबत दिसला होता, मात्र परतताना हसिनी तिच्या मृत पतीच्या मोटारसायकलवरून दोन अनोळखी पुरुषांसोबत (तिचा प्रियकर आणि त्याचा साथीदार) परतताना दिसली.
सर्व आरोपींना अटक
मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स (CDR) आणि सीसीटीव्ही फुटेज यांसारख्या ठोस डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हसिनी, तिचा प्रियकर युगंधर आणि हत्येत सहभागी असलेल्या इतर आरोपींना अटक केली आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत, परंतु या घटनेने पुन्हा एकदा मानवी नातेसंबंधांना काळीमा फासला आहे.
