1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (17:21 IST)

चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात महाराष्ट्रातील न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे. नायडूं यांच्यासह १५ जणांविरुद्ध हे अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. 2010 मध्ये गोदावरी नदीवरील बाभळी प्रकल्पाविरुद्ध आंदोलन केल्याप्रकरणी हे अटक वॉरंट बजावले आहे. धर्माबाद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.आर. गजभिये यांनी या प्रकरणात नायडू यांच्यासह सर्वांना अटक करून २१ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. 
 
या प्रकरणात 2010 मध्ये त्यांनी बाभळी प्रकल्पाविरुद्ध आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक करून पुण्यातील तुरुंगात ठेवले होते. त्यानंतर त्यांनी जामीन नाकारला होता. पण नंतर नायडूंची सूटका करण्यात आली होती. नायडू यांच्यावर या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणणे, धोकादायक शस्त्राद्वारे इजा पोहचवणे, धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.