गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (12:02 IST)

‘अटकी, भटकी आणि लटकी काँग्रेस’, मोदींच्या संसदेतील भाषणाचे 3 अर्थ

narendra modi
सोमवारी (5 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत तब्बल 90 मिनिटे भाषण ठोकून निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शनानिमित्त पंतप्रधान मोदी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्याआधीचं मोदींचं हे पहिलं मोठं भाषण होतं.
 
संसदीय परंपरेप्रमाणे या भाषणात पंतप्रधानांनी त्यांच्या आजवरच्या कामकाजाचं मार्कशीट सादर करणं अपेक्षित होत.
 
पण मोदींनी भाषणाचा 80 टक्क्यांहून अधिक वेळ हा काँग्रेस, राहुल गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, घराणेशाही याभोवतीच घालवला.
 
काँग्रेसने मात्र पंतप्रधान मोदींच्या दाव्याला 'अहंकारी' ठरवत त्यांनी जनतेच्या खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे.
 
काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले, "भारतीय मतदार 2024 च्या निवडणुकीत हा अहंकार मोडून काढेल."
 
स्वत:च्या सरकारच्या सगळ्या चुका झाकण्यासाठी भाजपा इतिहासातल्या नेहरुंकडे बोट दाखवत असते आणि स्वत:ची सुटका करुन घेत असते, असंही काँग्रेसकडून म्हटलं गेलं.
 
मोदींनी केलेल्या या भाषणाची इतिहासात नोंद होईलच. सोबत या भाषणाचं अनेकजण विश्लेषणही करतील. आपण मोदींच्या या भाषणातील 3 ठळक मुद्द्यांचे अर्थ समजून घेऊयात.
 
‘अबकी बार 400 पार’ हा आत्मविश्वास कुठून आला?
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 370 जागा जिंकेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यांच्या मते, भाजपच्या नेतृत्वाखालील NDAला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील.
 
आपल्या सरकारच्या कामांची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आता आमच्या सरकारची तिसरी टर्मही दूर नाही. जास्तीत जास्त 125 दिवस शिल्लक आहेत." आणि ‘अब की बार’... असं बोलून पंतप्रधान मोदी थांबले आणि भाजप खासदारांनी ‘400 पार’ असे उत्तर दिलं.
 
2019मध्ये भाजपने एकूण 303 जागांवर विजय मिळवला होता. तेव्हा त्यांनी 437 जागांवर उमेदवार दिले होते. भाजपला किमान 370 जागा जरी जिंकायच्या म्हटलं तरी ते आव्हानात्मक काम आहे. मग मोदींना निवडणुकीआधी एवढा आत्मविश्वास कुठून आला असावा?
 
यामागे तीन महत्त्वाची कारणे असल्याचं दिल्लीस्थित Centre For Policy Researchचे फेलो डॉ. राहुल वर्मा सांगतात. ती म्हणजे 1) राम मंदिराचं भव्य उद्धाटन 2) कमकुवत झालेली INDIA आघाडी. 3) 2023 मधील विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय.
 
“राम मंदीर आणि इतर हिंदुत्ववादी धोरणांमुळे मोदींनी आपली प्रतिमा हिंदूऱ्हदयसम्राट अशी केलीय. तर नितीश कुमारांचं भाजपमध्ये जाणं, ममता यांची ताठ भूमिका, आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षांचा इशारा या सर्व गोष्टींमुळे INDIA आघाडीची ताकद नेस्तनाबूत करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. यासोबत 2023मधील विधानसभा निवडणुकीतही भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. या तीनही गोष्टींमुळे भाजपचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे," असं डॉ. राहुल वर्मा सांगतात.
 
2018 साली जेव्हा भाजपला तत्कालीन विधानसभा निवडणुकीत फटका बसला होता. त्यानंतरही मोदींची त्सुनामी लाट विरोधक थांबवू शकले नव्हते.
 
पण प्रत्यक्षात भाजप 370 आणि NDA आघाडीला 400 हून अधिक जागा जिंकणं अवघड आहे, असं राजकीय विश्लेषक किडवई यांना वाटतं.
 
भाजपने 2019मध्ये 437 जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी त्यांना 303 जागा जिंकता आल्या. पण यावेळी भाजपला नितीश कुमार, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि आणखी NDA घटकांसोबत जागा वाटप करावं लागेल.
 
त्यामुळे भाजपच्या वाट्याला जेमतेम 400 जागा येतील त्यापैकी ते 370 जिंकतील का? हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचं किडवई सांगतात.
 
तसंच तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा याठिकाणी भाजपची स्थिती चांगली नाहीये. केवळ विरोधकांना भयभीत करण्यासाठी मोदी हा सायकॉलॉजिकल गेम खेळत आहेत, असं किडवई म्हणाले.
 
या दरम्यान, भाजपची विजयी घौडदौड रोखणं शक्य आहे. पण त्यासाठी INDIA आघाडीची मोट मजबूत पाहिजे, असं Centre for the Study of Developing Societies (CSDS)चे प्राध्यापक संजय कुमार सांगतात.
 
INDIA आघाडीने मिळून भाजपविरोधात एकच उमेदवार दिला तर मोदींच्या पायाखालची वाळू सरकू शकते. पण ही गोष्ट सध्याच्या परिस्थितीत दूरपर्यंत दिसत नाही. उलट INDIAची पकड आणखी सैल होऊ लागलीय.
 
‘अटकी, भटकी और लटकी’ काँग्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तसं पाहायला गेलं तर निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस सध्याच्या घडीला भाजपसमोर तग धरू शकत नाही. किंबहुना 2019मध्ये ज्याठिकाणी भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली, त्याठिकाणी भाजपने सर्वात जास्त बाजी मारली आहे.
 
असं असताना, मोदींनी भाषणाचा बराचसा वेळ काँग्रेसवर हल्ला करण्यात का घालवला? त्यांनी काँग्रेसवर तीक्ष्ण आणि एकदम तपशिलवार टीका केली.
 
याचं कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काँग्रेसच्या ऐतिहासिक राजकारणात दडलं आहे. सध्या जरी त्यांची निवडणुकीत ताकद कमी पडत असली तरी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस हा एकमेव पक्ष भाजपला चॅलेंज देऊ शकतो.
 
इतर प्रादेशिक पक्षांनी कितीही उदळआपट केली तरी ते राष्ट्रीय पातळीवर मोदींना शह देऊ शकत नाही. याशिवाय अनेक पक्षांसोबत भाजपने आघाडी केलीय किंवा त्यांच्यासोबत मोदी आघाडीसाठी बातचित करू शकतात, असं रशीद किडवई सांगतात.
 
पंतप्रधान मोदींनी आरोप केला की, “काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचे खूप नुकसान झाले आहे. काँग्रेसचा देशाच्या क्षमतेवर कधीच विश्वास नव्हता. ते स्वत:ला शासक मानत राहिले आणि जनतेला कमी लेखत राहिले.”
 
अशा टीकेतून मोदी स्वत:ची विश्वासार्हता वाढवण्यासाठी ते काँग्रेसच्या कार्यकाळाला लक्ष्य करत आहेत, असंही किडवई सांगतात.
 
ते पुढे सांगतात, “काँग्रेसने 4 दशकांहून अधिक काळ एकहाती सरकार चालवलं आहे. त्यांचं कामकाज हे अर्धा ग्लास फुल आणि अर्धा रिकामा, असा आहे. मोदी काँग्रेसच्या चांगल्या कामाचा कधीच उल्लेख करत नाही. यातून ते 2014च्या आधी देशात काहीच प्रगती झाली नाही. आपण सत्तेत आल्यानंतर देशाच्या प्रगतीचा वेग वाढला, असं सांगून ते स्वत:ची विश्वासार्हता वाढवू पाहतायत.”
 
 
मोदींच्या भाषणात त्यांनी ‘अटकी, भटकी और लटकी’ काँग्रेस असा उल्लेख केला. अटकी म्हणजे UPA सरकारच्या धोरण लकवा. UPA काळात ठोस धोरणांचा अभाव होता. भटकी म्हणजे दिशाहीन झालेली काँग्रेस, ज्याला स्वत:चं ध्येय राहिलं नाही. लटकी म्हणजे - पक्षांतर्गत निर्णय घेण्यात अपयशी ठरलेले नेते. त्याचा फटका INDIA आघाडीतल्या पक्षांनाही बसल्याचा दावा मोदींनी केला.
 
यानंतर राहुल गांधींचे नाव न घेता मोदी म्हणाले की, एकच उत्पादन पुन्हा पुन्हा बाजारात आणल्यामुळे काँग्रेसचं दुकान बंद पडत आहे. मोदींनी काँग्रेस ही दुकान आहे असा उल्लेख केला. कारण, राहुल गांधी यांनी, 'नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान', असं अनेकदा म्हटलं. त्याला मोदींनी अशाप्रकारे उत्तर दिलं.
 
खरंतर, राहुल गांधी यांना 2019मध्ये निवडून येण्यासाठी केरळमध्ये सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला. ते मोदींना निवडणुकीच्या रिंगणात आव्हान देऊ शकत नाहीत. तरीही मोदी राहुल गांधींना लक्ष्य करण्याचं सोडत नाहीत.
 
या मुद्द्यावर राहुल वर्मा सांगतात, “राहुल गांधींचा चेहरा देशातल्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. ते मोदी आणि भाजपवर राहुल गांधी अगदी थेट हल्ला चढवतात. साहजिकच मोदींना पण त्यांना प्रत्युत्तर देणं अपेक्षित आहे.”
 
दुसरं कारण म्हणजे भाजपसाठी लोकसभा निवडणूक ‘मोदी विरुद्ध राहुल गांधी’ अशाप्रकारे लढली तर आणखी सोईस्कर जाते. राहुल गांधी यांच्यासमोर नरेंद्र मोदींना एक मजबूत नेता म्हणून प्रोजेक्ट करणं भाजपला सोपं जातं. याउलट लोकसभा निवडणूक BJP विरुद्ध INDIA अशी झाली तर मोदींसाठी ती अवघड परीक्षा होऊ शकते, असं संजय कुमार यांना वाटतं.
 
इंदिरा - नेहरूंवर टीका आणि मोदींची वैचारिक लढाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरही निशाणा साधला.
 
दोन्ही माजी पंतप्रधानांच्या भाषणातील निवडक उतारे त्यांनी वाचून दाखवले. नेहरूंनी भारतीय लोकांना आळशी म्हटलं. तर इंदिरा गांधी यांनी लोकांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले असा निष्कर्ष मोदी यांनी काढला.
 
नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावरची टीका ही वैयक्तिक नसून ही त्यांच्या धोरणांना मोदी सतत लक्ष्य करतात. कारण, मोदींना काँग्रेसवर वैचारिक पातळीवर विरोध करायचा असतो, असं संजय कुमार सांगतात.
 
काँग्रेसकडूनही सावरकर यांच्यावर टीका होते. राष्ट्रीय स्वंयसंघावर टीका होते. भाजपच्या हिंदूत्व राजकारणावर टीका होते. त्यामुळे मोदी आणि भाजपकडून काँग्रेस विचारसरणीवर टीका करताना नेहरू-गांधी विचारधारेवर टीका केली जाते.
 
नेहरू-गांधीवर टीका करणं ही मोदींची वैचारिक लढाई असल्याचं डॉ राहुल वर्मा यांनाही वाटतं.
 
जेव्हापासून नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रात सत्तेवर आलं आहे, तेव्हापासून पंडित नेहरू हे कायम चर्चेत आहेत.
 
भाजपाचं शीर्ष नेतृत्व असो वा अगदी कार्यकते आणि समाजमाध्यमांवरचे समर्थक, या सगळ्यांनी पंडित नेहरुंवर टीका केली आहे.
 
केवळ टीका नव्हे तर उजव्या विचारसरणीच्या अनेकांकडून इतिहासातल्या निर्णयांबद्दल वा घटनांबद्दल नेहरुंना जबाबदार ठरवलं गेलं.
 
दुसरीकडे, असंही म्हटलं गेलंय की नेहरुंचा आणि त्यांच्या वैचारिक, राजकीय धोरणांचा एवढा खोल परिणाम भारताच्या वर्तमानावर आहे की, तो आजही त्यांच्या राजकीय विरोधकांना ओलांडून पुढे जाता येत नाही.
 
ती राजकीय संस्कृती गेली तरच त्यापेक्षा वेगळा राजकीय विचार दीर्घकाळ तग धरू शकेल.
 
नेहरुप्रणित समाजवादाचा भारतीय राजकारण, समाजकारण, अर्थकारण यांच्यावर एवढा प्रभाव राहिला की डावी-कम्युनिस्ट विचारधारा वा उजवी हिंदुत्ववादी विचारधारा वा समाजवादाची इतर रूपं बराच काळ तग धरू शकली नाहीत, विस्तारू शकली नाहीत.
 
2014 नंतर उजव्या हिंदुत्ववादी राजकारणाची नवी लाट देशात आली, पण अजूनही नेहरुप्रणित व्यवस्थेचं आव्हान अजूनही त्यासमोर आहे, म्हणून त्यांच्यावर आज ही टीका पहायला-ऐकायला मिळते, असं किडवई सांगतात.
 
त्यात तिसरा मुद्दा हा घराणेशाही येतो. मोदींच्या भाषणांमध्ये कॉंग्रेसवर टीका करतांना घराणेशाहीवर बोललं जातं.
 
भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यांच्यातून नेते तयार होतात. पण नेहरू-गांधी घराण्याकडे बोट दाखवून कॉंग्रेस हा एका कुटुंबानं चालवलेला पक्ष आहे, असा आरोप मोदींकडून सातत्यानं होतो.
 
 
 
Published By- Priya DIxit