1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. audio of Jaipur dead girl emerges

"मम्मा मला दुसऱ्या शाळेत टाक"; मृत मुलीचा ऑडिओ समोर आल्याने खळबळ; शाळेच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह

जयपूर येथील नीरजा मोदी स्कूलमध्ये शिकणाऱ्या अमायरा नावाच्या ९ वर्षांच्या विद्यार्थिनीचा १ नोव्हेंबर रोजी शाळेच्या इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अमायरा आणि तिच्या आईमधील एका हृदयद्रावक फोन संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला एक वेगळी दिशा मिळाली आहे.

ऑडिओ रेकॉर्डिंगमधील धक्कादायक माहिती
मृत्यूपूर्वी जुलै २०२४ मध्ये अमायरा आणि तिच्या आईमध्ये झालेल्या संभाषणात, अमायरा शाळेत जाण्यास स्पष्टपणे नकार देत आहे. अमायराचे शब्द "मम्मा, मला शाळेत जायचं नाहीये. सगळे मला त्रास देतात. दररोज कोणी ना कोणी माझ्याबद्दल तक्रार करतं. प्लीज, मला इथून बाहेर काढा. मला दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घ्या. मी हे आणखी सहन करू शकत नाहीये," अशी विनवणी ती आपल्या आईकडे करत असल्याचे या ऑडिओमध्ये ऐकू येते. या रेकॉर्डिंग आणि पालकांच्या तक्रारींमुळे, मुलीच्या मृत्यूमागे शाळेतील छळवणूक आणि शालेय प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष असल्याचे आरोप पालकांनी केले आहेत.
 
पालकांनी केले दुर्लक्षाचं आरोप
अमायराच्या आईने हा ऑडिओ आणि छळवणुकीबद्दलची चिंता तिची वर्गशिक्षिका व शाळा प्रशासनाला कळवली होती. त्यांनी वर्गशिक्षकांना मेसेजमध्ये, "सर्वांनाच तिचा त्रास होत आहे. ती घाबरली आहे आणि उद्यापासून तिला शाळेत जायचे नाही," असे स्पष्टपणे लिहिले होते. पालकांचा आरोप आहे की, इतकी स्पष्ट तक्रार करूनही शिक्षकांनी या मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि कोणतीही कारवाई केली नाही. अमायराचे वडील विजय यांनी एका पालक-शिक्षक बैठकीत एका मुलाने आपल्या मुलीकडे धमकावणारे हावभाव केले होते, याबाबत तक्रार केली असता शिक्षकांनी, "अमायराने समजून घ्यावं की ही अनुदानीत शाळा आहे," असे उद्धट उत्तर दिले होते.
 
घटनेचा दिवस आणि सध्याची स्थिती
१ नोव्हेंबर रोजी अमायरा नीरजा मोदी स्कूलच्या चौथ्या मजल्यावरील कठड्यावर चढून सुमारे ४८ फूट खाली पडताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली. तिला रुग्णालयात नेले असता, दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. अमायराच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी शाळेविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पालकांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्य दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
 
शाळेकडून या घटनेवर अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. अमायराच्या कुटुंबीयांचा आणि पालक संघटनेचा संघर्ष दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू आहे.
पुढील लेख
सज्ज व्हा! हवामानात गारठा वाढला