1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2024 (08:41 IST)

बाबा रामदेव यांना मोठा धक्का! या राज्याने घातली पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. योगगुरू रामदेव यांच्या मालकीच्या पतंजली या आयुर्वेदिक कंपनीवर उत्तराखंड सरकारने कारवाई सुरू केली आहे.
उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी घातली आहे. उत्तराखंड औषध नियंत्रण विभागाच्या परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या दिव्या फार्मसी कंपनीच्या उत्पादनांवर ही बंदी घातली आहे. या उत्पादनांमध्ये मुक्ता वती एक्स्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट यांचा समावेश आहे.
 
इतकंच नाही तर रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली यांच्याविरोधात ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडीज कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रामदेव आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली आहे. वास्तविक, उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. या शपथपत्रात उत्तराखंड सरकारने बाबा रामदेव यांच्या कंपनीवर ड्रग अँड मॅजिक रेमेडीज कायद्यांतर्गत काय कारवाई केली हे सांगितले. उत्तराखंड सरकारने 15 एप्रिलच्या आदेशाने तंजलीच्या 14 उत्पादनांचे परवाने निलंबित केल्याचे सांगण्यात आले.
 
दिव्या फार्मसीच्या ज्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये श्वासरी गोल्ड, श्वासरी वटी, दिव्या ब्रॉन्कॉम, श्वासरी प्रवाही, श्वासरी अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत ॲडव्हान्स, लिवोग्रिट गोल्ड, आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप. पतंजलीच्या काही उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काही काळापूर्वी बाबा रामदेव यांची ताशेरे ओढले होते. पतंजली प्रकरणावर उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे... यादरम्यान योगगुरू स्वामी रामदेव यांच्यावर अवमानाचा गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Edited By- Priya Dixit