Bihar : कारच्या आत अडकून दोन मुलांचा होरपळून मृत्यू
बिहारची राजधानी पाटणा येथील मसौरी परिसरातून एक वेदनादायक घटना समोर आली आहे. येथे एका घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये दोन निरागस मुले खेळत असताना कारने पेट घेतला आणि आगीत दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला.ही घटना सोमवारी रात्री घडली.
मसौरी येथील गौरीचक पोलीस स्टेशन हद्दीतील सोहगी रामपूर गावातील रहिवासी संजीत कुमार आपल्या कुटुंबासह घरात होते.त्यांनी घराबाहेर अल्टो कार उभी केली होती. त्याचा आठ वर्षांचा मुलगा राजपाल आणि भावाची सहा वर्षांची मुलगी सृष्टी हे दोघे कार मध्ये खेळत होते.कारचे दार लॉक होते आणि काचा देखील लागलेल्या होत्या.
काही वेळाने कारमधून अचानक धूर येऊ लागला. धूर दिसताच काही स्थानिक लोकांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली.आवाज ऐकून संजीत कुटुंब घराबाहेर आले आणि कारच्या दिशेने धावले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि आतील दोन्ही मुले गंभीररीत्या भाजली होती.कारच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
मुलांचा मृत्यूने कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. दोन्ही मुलांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच गौरीचक पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या संदर्भात कुटुंबीयांची चौकशी केली. कारला आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहे.
Edited By- Priya DIxit