1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2024 (16:14 IST)

भाजप उमेदवार करण भूषण शरण सिंह यांच्या ताफ्याच्या गाडीने 3 मुलांना चिरडले, दोघांचा मृत्यू

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा आणि भाजपचे उमेदवार करण भूषण शरण सिंह यांच्या ताफ्याच्या गाडीला उत्तर प्रदेशातील गोंडा येथील कर्नलगंज हुजूरपूर रोडवरील बैकुंठ पदवी महाविद्यालयाजवळ भीषण अपघात झाला आहे. फॉर्च्युनर कारने 3 मुलांना चिरडले आहे. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून ग्रामस्थांनी फॉर्च्युनर कार ताब्यात घेतली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा दाखल झाला असून मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. 
 
यूपीच्या कैसरगंज लोकसभा जागेवर भाजपने विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट रद्द करून त्यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली आहे. करण हा ब्रिजभूषण यांचा धाकटा मुलगा आहे. डबल ट्रॅप नेमबाजीत तो राष्ट्रीय खेळाडू राहिला आहे. 
 
करणने बीबीए आणि एलएलबी केले असून ऑस्ट्रेलियातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला आहे. सध्या ते यूपी रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. करण पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहे.
 
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण भूषण यांच्या ताफ्यातील गाडीने हा अपघात झाला असून या ताफ्यात करण होते की नाही याचा तपास लावला जात आहे.करण भूषण यांचे नाव तक्रारीत नाही. कर्नलगंज पोलीस ठाण्यात तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल  करण्यात आला  आहे. फॉर्च्युनर कार आणि तिच्या चालकाला ताब्यात घेऊन पोलीस कारवाई करत आहेत. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त आहे. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सामान्य आहे.
 
Edited by - Priya Dixit