शनिवार, 2 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जून 2020 (16:51 IST)

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील फत्तरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भुजैनी गावात घडला आहे. यात गावात दाखल झालेल्या पोलिसांना गावातील गुंडांनी अक्षरशः पिटाळून लावले. गावातील गुंडांनी पोलिसांची वाहनंही जाळून टाकली आणि पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत पोलीसही जखमी झाले.
 
भुजैनी गावातील एका आंब्याच्या बागेत तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आणि गावात धुमश्चक्री सुरु झाली. जाळून हत्या झालेल्या तरुणाचे शेजारच्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. ते दोघेही लग्न करण्याच्या विचारात होते, पण घरच्यांचा त्याला विरोध होता. गावातील ही तरुणी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती होऊन कानपूरला गेली. त्यानंतर या तरुणाने तिच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
 
तरुणाने तरुणीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने तरुणीचे वडील संतप्त झाले आणि तरुणाविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला. तरुणाला अटक करण्यात आली होती. पण कोरोना व्हायरसच्या साथीमुळे तो १ मे रोजी जामिनावर सुटून गावात आला होता. दरम्यान, सोमवारी दुपारी हा तरुण घरातून निघाला, तो संध्याकाळपर्यंत घरी परतलाच नाही. त्यामुळे शोधाशोध सुरु झाली, तेव्हा त्याचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. या तरुणाचे हातपाय बांधून झाडाला बांधले आणि पेटवून देऊन जीवंत जाळले, अशी माहिती पुढे आली आहे.