राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून लाखोंची देणगी - भाजप
काँग्रेस आणि चीनचे छुपे संबंध असून चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला लाखोंची देणगी दिली आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यातील भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या जवानांमध्ये संघर्ष होऊन त्यात 20 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने केंद्र सरकारच्या चीन धोरणावर टीका करत आहेत.
इतकंच नव्हे तर नरेंद्र मोदी हे 'सरेंडर' मोदी असून त्यांनी चीनसमोर शरणागती पत्करल्याची टीकाही गांधी यांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे दिले. काँग्रेसच्या कार्यकाळातच चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला होता.
भारतीय कायद्यानुसार कोणताही राजकीय पक्ष सरकारच्या परवानगीशिवाय विदेशातून पैसा स्वीकारू शकत नाही. मग काँग्रेसने चीनकडून पैसे स्वीकारताना सरकारची मंजुरी घेतली होती का, असा सवाल केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला.
तर राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने देणगी देणं धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जे. पी. नड्डा यांनी दिली.