गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (00:03 IST)

सायरस मिस्त्रींना टाटा समूहातून काढून टाकण्यात आलं होतं, कारण...

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं 4 सप्टेंबरला पालघरमध्ये अपघाती निधन झालं. मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर मुंबईतल्या वरळी येथील स्मशानभूमीत दाहसंस्कार करण्यात आले.
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा टाटा समूहासोबतचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सायरस मिस्री हे 2012 ते 2016 या काळात टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर होते. त्यांची नेमणूक जितकी भुवया उंचावणारी होती, तेवढ्याच अचानकपणे त्यांना या पदावरून दूरही करण्यात आलं होतं.
 
नेमकं काय घडलं होतं? सायरस मिस्त्री यांचं टाटा समूहाशी काय नातं आहे, त्यांना अध्यक्षपदावरून का काढण्यात आलं होतं आणि त्यानंतर काय काय घडलं, जाणून घेऊयात...
 
सायरस मिस्त्री टाटा समूहात कसे आले?
सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाकडे शापूरजी पालनजी ग्रुप या मुंबईतल्या कंपनीची मालकी आहे.
 
1865 साली स्थापन झालेली ही कंपनी बांधकाम क्षेत्रात देशातल्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमसारखी स्टेडियम्स, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, तसंच बोगदे, ब्रिजेस आणि संस्थांच्या इमारती अशा बांधकामांसाठी ही कंपनी ओळखली जाते.
 
इंजिनियरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट यांसोबतच उर्जा, जलशुद्धीकरण, फायनान्स अशा इतरही काही उद्योगांमध्ये त्यांचा विस्तार झाला.
याच शापूरजी पालनजी कंपनीकडे टाटा सन्सचे 18.37 टक्के शेअर्स आहेत. साधारण 1936 पासून म्हणजे सायर मिस्त्रींच्या आजोबांच्या काळापासून या दोन कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार होत आले आहेत आणि दोन्ही कुटुंबांमध्ये नातंही आहे. रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा, हे सायरस मिस्त्री यांच्या बहिणीचे पती.
 
तर टाटामध्ये शेअरहोल्डर असलेल्या शापूरजी पालनजी ग्रुपचे प्रतनिधी म्हणून सायरस मिस्त्री 2006 पासून टाटा ग्रुपच्या बोर्डवर म्हणजे संचालक मंडळावर होते.
 
त्यावेळी अध्यक्षपदावर असलेल्या रतन टाटा यांनी 2010 साली पुढच्या काही वर्षांत पद सोडण्याचा विचार बोलून दाखवला आणि त्यानंतर आपला उत्तराधिकारी शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली.
 
या समितीनं 2012 साली सायरस मिस्त्री यांची एकमतानं निवड केली, त्याला रतन टाटांचाही पाठिंबा होता.
 
2011 साली एका निवेदनात टाटा मिस्त्रींविषयी म्हणाले होते, 'त्यांची गुणवत्ता आणि क्षमता, त्यांनी बारकाईनं केलेली निरीक्षणं आणि त्यांची नम्रता यामुळे प्रभावित झालो आहे."
 
टाटा कुटुंबीयांव्यतिरिक्त टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारे सायरस मिस्त्री केवळ दुसरे गृहस्थ होते. मात्र, टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात अडकली.
 
चारच वर्षांत मिस्त्रींना काढून टाकण्यात आलं, टाटा समूहाची हंगामी जबाबदारी पुन्हा रतन टाटांनी उचलली. काही महिन्यांनी एनं चंद्रशेखरन यांची त्या पदावर नियुक्ती झाली. सध्या तेच टाटा समूहाचे चेअरपर्सन आहेत.
 
पण असं काय घडलं, की या संचालक मंडळानं मिस्त्रींना पदावरून दूर केलं गेलं?
 
सायरस मिस्त्रींना पदावरून का काढलं गेलं?
 
24 ऑक्टोबर 2016 रोजी सायरस मिस्त्रींना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आलं. काही वेळाने त्यांची कंपनीच्या संचालक मंडळातून हकालपट्टी करण्यात आली.
 
भारतातल्या उद्योगविश्वासाठी तो एक मोठा धक्का होता. एवढ्या वेगानं घडामोडी घडल्या, की त्या पाहून कुणाला एखाद्या बॉलिवूड फिल्मची आठवण यावी.
 
सायरस मिस्त्रींना नेमकं का काढण्यात आलं याची अधिकृत कारणं तेव्हा देण्यात आली नाहीत. त्याविषयी बरीच गुप्तता पाळण्यात आली. पण मिस्त्रींची कार्यपद्धती, त्यांची कामगिरी आणि निर्णयांवरून मतभेद असल्यानंच असा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलं.
 
तर कंपनी कायद्याचं उल्लंघन करून मला हटवण्यात आलं, असा दावा मिस्त्री यांनी केला होता. त्याचसोबत त्यांनी टाटा सन्सच्या व्यवस्थापनाविरोधात गैरव्यवहार केल्याचा आरोपही केला होता.
 
विश्लेषकांच्या मते, (screenshots of news reports) रतन टाटांनी तेव्हा पद सोडलं होतं, पण संचालक मंडळावर त्यांचा प्रभाव कायम होता तर सायरस मिस्त्रींची विचारसरणी ही टाटांपेक्षा वेगळी होती. मिस्त्री लंडनमध्ये बिझनेसचं शिक्षण घेऊन आले होते. बिझनेसविषयीच्या त्यांच्या कल्पना आणि कार्यपद्धती यावरून समूहात मतभेद झाल्याचं तेव्हा समोर आलं.
 
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार सायरस यांनी तोट्यात चालणारे उद्योग बंद करून केवळ नफा देणाऱ्या गोष्टींवर भर द्यायला सुरूवात केली.
 
पण ते रतन टाटांना रुचलं नाही, कारण काही उद्योग हे या समूहासाठी लेगसी बिझनेस म्हणजे वारसा जपणारे उद्योग होते. तर मिस्त्रींना वाटत होतं की आपण हे उद्योग बंद करून गोष्टी सावरतो आहोत.
 
सायरस मिस्त्री रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली आधीपासूनच काम करत होते. मात्र, त्यांनी परस्पर निर्णय घ्यायला सुरुवात केले होते. पण सायरस हे मृदूभाषी आणि समंजस असल्याचं त्यांचे मित्र सांगतात.
 
ज्येष्ठ पत्रकार एम. के. वेणू सांगतात, "2002 ते 2008 या कालावधीत भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेने भरारी घेतली तेव्हा रतन टाटा यांनी जागतिक कंपन्या ताफ्यात समाविष्ट करण्यास सुरुवात केली. या काळात रतन यांनी कोरस, टेटली आणि अनेक हॉटेल्स ताब्यात घेतले.
 
"यापैकी अनेक अधिग्रहण योग्य नव्हते. मिस्त्री टाटा समूहाचे अध्यक्ष झाल्यानंतर वारसा हक्काने त्यांना जे मिळालं त्यापैकी तोट्यात असणाऱ्या कंपन्या त्यांनी विकायला सुरुवात केली. काही प्रमाणात असं करणं म्हणजे रतन टाटा यांनी घेतलेले निर्णय बदलण्यासारखं होतं. रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून मतभेद असावेत. ज्यामुळेच मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं".
 
कोर्टात काय झालं?
कार्यक्षमतेवर शंका घेतली गेल्यानं सायरस मिस्त्रींनी कोर्टाची वाट धरली आणि टाटा समूहामध्ये अल्पशेअरधारकांना दाबून टाकलं जात असल्याचा आरोप केला.
 
जुलै 2018 मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलनं मिस्त्री यांना पदावरून काढून टाकण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला. मिस्त्रींनी टाटा समूहातील कंपन्यांची माहिती आयकर विभागाला दिली, माध्यमांमध्ये माहिती लीक केली, कंपनीच्या विरोधात भाष्य केलं आणि त्यामुळेच त्यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाचा विश्वास गमावला आहे, हे कोर्टानं मान्य केलं.
 
मिस्त्रींनी त्या निर्णयाविरोधात अपील केलं, तेव्हा डिसेंबर 2019 मध्ये त्यांच्या बाजूनं निकाल लागला.
 
पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायाधीशांनी टाटा सन्सच्या बाजूनं कौल दिला. भारताचे तत्कालिन सरन्यायाधीश अरविंद बोबडे यांनी सुनावणीवेळी म्हटलं, याप्रकरणी सर्व कायदे टाटा यांच्या बाजूनेच आहेत.
 
त्याविरोधातली मिस्त्रींची पुनर्विचार याचिका मे 2022 मध्ये फेटाळली गेली आणि मिस्त्री आणि टाटा समूहातली सहा वर्षांची कायद्यीच लढाईही संपली.
 
या लढाईनं शापूरजी पालनजी आणि टाटा सन्समधल्या नात्यातही वितुष्ट आलं. शापूरजी पालनजी ग्रुपला गेल्या काही वर्षांत विशेषतः कोव्हिडच्या काळात आर्थिक चणचण जाणवत होती. पण कंपनीतल्या तरतुदींमुळे त्यांच्याकडे असलेले टाटा समूहाचे शेअर्स त्यांना विकता येत नव्हते. आता सायरस यांच्या अकाली निधनाचे या उद्योगसमूहावर काय परिणाम होतात हे पाहावं लागेल.