रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2023 (11:45 IST)

प्रकाश सिंह बादल यांचं निधन, सरपंच ते 5 वेळा मुख्यमंत्री, असा आहे प्रवास

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून प्रकाश सिंह बादल यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. गेल्यावर्षीही त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता. तसंच, कोव्हिडची लागणही त्यांना झाली होती.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाश सिंह बादल यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. ट्वीट करत मोदींनी म्हटलंय की, "प्रकाश सिंह बादल यांचं निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. पंजाब राज्याच्या विकासासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले."
 
सरपंच ते 5 वेळा मुख्यमंत्री
प्रकाश सिंह बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 रोजी पंजाबमधील भटिंडा येथील अबुल खुराना गावात झाला.
 
त्यांना पीसीएस अधिकारी बनायचे होते, पण अकाली नेते ग्यानी करतार सिंह यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला, असं सांगितलं जातं.
 
1947 मध्ये गावचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
 
अनेक दशकांपासून पंजाबच्या राजकारणाचा ते महत्त्वाचा चेहरा राहिले.
प्रकाश सिंह बादल यांनी 1957 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली.
 
1970 मध्ये 43 वर्षांचे असताना ते पंजाबचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनले. प्रकाश सिंह बादल यांनी एकूण 5 वेळा पंजाबचं मुख्यमंत्रिपद भूषवलं.
 
त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रमही आहे. एकीकडे ते पंजाबचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनले, तर दुसरीकडे जेव्हा त्यांनी 2017 मध्ये मुख्यमंत्री म्हणून पाचवा कार्यकाळ पूर्ण केला, तेव्हा ते सर्वांत वयस्कर मुख्यमंत्री देखील होते. त्यावेळी त्यांचं वय 90 वर्षं होतं.
 
ते शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख होते. हा पक्ष नेहमी शीखांच्या प्रतिनिधीत्वाबद्दल बोलत आला हे. या पक्षाने अनेकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढे जाणाऱ्या भाजपला पाठिंबा दिला आहे.
 
प्रकाश सिंह बादल यांच्या पत्नी सुरिंदर कौर यांचं निधन झालं आहे. त्यांचा मुलगा सुखबीर सिंग बादल आणि सून हरसिमरत कौर बादल हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत.
काँग्रेस, अकाली दल, एनडीए...
प्रकाश सिंह बादल यांचे राजकारण 1947 पासून सुरू झाले. वडील रघुराज सिंह यांच्याप्रमाणे ते बादल गावचे सरपंच झाले.
 
त्यानंतर त्यांची लांबी ब्लॉक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
 
इतर अकालींप्रमाणे, प्रकाशसिंग बादल 1957 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर लढून पहिल्यांदा आमदार झाले.
 
प्रकाश सिंह बादल हे अकाली दलाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा पुरस्कार करणाऱ्या आणि देशातील प्रादेशिक पक्षांना सक्षम बनवणाऱ्या नेत्यांच्या श्रेणीत येतात.
 
ही गोष्ट वेगळी की 1997 मध्ये देशातील प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचा पाठिंबा दिला आणि एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले, तेव्हा प्रकाशसिंग बादल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बाजूने गेले.
 
ते सुरुवातीपासूनच काँग्रेसचे कट्टर टीकाकार असल्याचं प्रकाश सिंह बादल यांनी सांगितलं होतं. पंजाबी सुबे आघाडीपासून ते धर्मयुद्ध आघाडीपर्यंत आणि पंजाबमधील सत्तासंघर्षासाठी त्यांना नेहमीच काँग्रेसशी संघर्ष करावा लागला आहे.
 
एका टीव्ही मुलाखतीदरम्यान, काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाल्यानंतर आणि अकाली दलात प्रवेश करताना ते म्हणाले होते, "माझा काँग्रेसवर सुरुवातीपासून विश्वास नव्हता."
 
सर्वात तरुण आणि सर्वात वृद्ध मुख्यमंत्री
प्रकाश सिंह बादल यांनी 1969-70 च्या मध्यावधी निवडणुका अकाली दलाच्या तिकिटावर लढवल्या आणि पंजाबच्या पहिल्या गैर-काँग्रेस सरकारमध्ये मंत्री बनले.
 
न्यायमूर्ती गुरनाम सिंग यांचे हे सरकार जनसंघाच्या (सध्या भारतीय जनता पक्ष) पाठिंब्याने स्थापन झाले आणि आमदार प्रकाश सिंह बादल दुसऱ्यांदा या सरकारच्या विकास खात्याचे मंत्री झाले.
 
पंचायत राज, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.
 
1970 मध्ये राज्यसभा निवडणुकीत अकाली उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे अकाली दलाचे तत्कालीन अध्यक्ष संत फतेह सिंग यांनी न्यायमूर्ती गुरनाम सिंग यांना बडतर्फ करून प्रकाश सिंह बादल यांना मुख्यमंत्री बनवले.
 
प्रकाश सिंह बादल पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा ते केवळ 43 वर्षांचे होते. ते 1967 मध्ये एकदा निवडणूक हरले. त्यानंतर 1969 पासून आजपर्यंत त्यांनी कधीही निवडणूक हरलेली नव्हते.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली.
 
1977 च्या निवडणुकीत अकाली दल आणि जनता पक्षाने मिळून सरकार स्थापन केले आणि प्रकाश सिंह बादल दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. यावेळी ते 1977 पासून 1980 पर्यंत सत्तेत होते.
 
त्यानंतर 1997 ते 2002 या काळात ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा 5 वर्षे राज्य केले.
 
त्यानंतर 2007 ते 2012 आणि 2012 ते 2017 मध्ये सलग दोन वेळा मुख्यमंत्री बनून बादल यांनी पंजाब राज्यासाठी नवा राजकीय विक्रम रचला.
 
फेब्रुवारी 2017 मध्ये, अकाली दलाच्या पराभवानंतर प्रकाश सिंह बादल यांनी राजीनामा दिला, तेव्हा ते 90 वर्षांचे होते.
 
Published By- Priya Dixit