गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 मे 2023 (20:19 IST)

आधी प्रेयसीची हत्या, नंतर फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या, काय आहे संपूर्ण प्रकरण?

death
फेसबुक आणि इंस्टाग्राम लाईव्ह केल्यानंतर अंकितने आत्महत्या केली नसती, तर 15 जून रोजी तो 22 वर्षांचा झाला असता.13 मे रोजी संध्याकाळी त्याच्या आत्महत्येच्या अवघ्या 23 तासांपूर्वी, त्याने त्याची कथित प्रेयसी निवेदिताची बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली आणि नंतर त्याच बंदुकीनं स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. निवेदिता फक्त 20 वर्षांची होती. 12 मे रोजी संध्याकाळी निवेदितावर गोळी झाडून अंकित फरार झाला होता. त्याने त्याचा फोन नंबर बंद केला होता.

पोलीस त्याचा शोध घेत होते, त्याचवेळी म्हणजे 13 मे रोजी संध्याकाळी तो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लाईव्ह आला आणि निवेदिताच्या हत्येची कबुली दिली.
 
लाईव्ह दरम्यान त्याने डोक्याजवळ बंदूक ठेवली आणि आत्महत्या करणार असल्याचे सांगितलं. त्यानंतर लाईव्ह बंद झालं.
 
आत्महत्येपूर्वी अंकितनं काय केलं?
आत्महत्येपूर्वी अंकितने त्याचं लोकेशन त्याच्या बहिणींना पाठवलं होतं. त्याचे कुटुंबीयही हे लाईव्ह पाहत होते. त्यामुळे त्या लोकांनी रांची पोलिसांशी संपर्क साधला आणि हे लोकेशन शेअर करून अंकितला वाचवण्याची विनंती केली.
 
ही माहिती मिळताच पोलीसही सज्ज झाले, मात्र घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच अंकितने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती.

रांचीच्या कोकर परिसरातून पोलिसांनी अंकितचा रक्ताने माखलेला मृतदेह ताब्यात घेतला. आपल्या सात भावंडांमध्ये अंकित सर्वात लहान होता.
 
अंकित आणि निवेदिता यांची वडिलोपार्जित गावे बिहारच्या नवादा जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत होती. पण नवादा शहरात त्यांची घरे शेजारी-शेजारीच होती. त्यांच्या जाती वेगळ्या होत्या आणि त्यांची सामाजिक स्थितीही वेगळी होती.
 
निवेदिता रांचीतील आयसीएफएआय विद्यापीठात बीबीएची विद्यार्थिनी होती. ती हरमू परिसरातील एका खासगी वसतिगृहात राहून शिकत होती.
 
त्याच वसतिगृहाजवळ अंकितने निवेदिताच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. या घटनेत निवेदिताची एक मैत्रीणही जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
 
निवेदिताच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं?
रांचीच्या अरगोडा पोलीस ठाण्याचे प्रभारी (रांची) विनोद कुमार यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, निवेदिता 12 मे रोजी संध्याकाळी एका मैत्रिणीसोबत वसतिगृहात परतत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
 
अंकित पायी चालत निवेदिताकडे आला आणि जवळून तिच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर जखमी अवस्थेत निवेदिताला राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) इथं उपचारासाठी नेण्यात आलं, तिथं तिला मृत घोषित करण्यात आलं.
 
या प्रकरणी निवेदिताच्या वडिलांच्या जबानीवरून अंकितविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
विनोद कुमार म्हणाले, “निवेदिताच्या नातेवाईकांनी अंकितवर हत्येचा संशय व्यक्त केला होता. आमच्या प्राथमिक तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्हाला याचे पुरावेही मिळाले आहेत. त्यामुळेच आम्ही त्याला अटक करण्यासाठी नवादा येथे एक टीम पाठवली होती.
“दरम्यान, 13 मे रोजी संध्याकाळी अंकितच्या फेसबुक लाईव्हबद्दल आम्हाला माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याचे लोकेशन ट्रेस केले. आम्ही तेथून अंकितचा रक्ताने माखलेला मृतदेह आणि शस्त्रे जप्त केली.
 
“प्राथमिक तपासावरून हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं दिसतंय. पुढील तपासासाठी फॉरेन्सिक आणि तांत्रिक पथकांची मदत घेतली जात आहे.”
 
दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
 
निवेदिताच्या मृतदेहाचे 13 मे रोजी तर अंकितच्या मृतदेहाचे 14 मे रोजी शवविच्छेदन करण्यात आलं.
 
दोन्ही अहवालात मृत्यूचे कारण ‘बुलेट इंज्युरी’ असं नमूद करण्यात आलं आहे.
 
नातेवाईकांचे काय म्हणणे आहे?
अंकितचा चुलत भाऊ सनोज यादव यानं बीबीसीला सांगितलं की, “निवेदिता रांचीला गेल्यानंतर अंकितही तिच्या वसतिगृहाजवळ भाड्याच्या घरात राहू लागला. निवेदिताही तिथे येत-जात असे.”
 
मिळालेल्या माहितीनुसार, 2019 सालापासूनच दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. सनोजच्या माहितीनुसार, “ही गोष्ट त्याच्या घरच्यांना माहीत होती आणि मुलीच्या घरच्यांनाही याची माहिती होती. अलीकडे काही कारणांमुळे दोघांचं बोलणं बंद झालं आणि मग ही दुःखद घटना घडली.”
 
निवेदिताचे वडील सिद्धेश्वर प्रसाद यांनीही या दोघांमधील संबंध स्वीकारले असून त्यांच्या मुलीने अंकितशी बोलणे बंद केल्याचं सांगितलं. त्यामुळे अंकित तिला त्रास देऊ लागला.
 
सिद्धेश्वर प्रसाद म्हणतात, “शेवटी त्याने माझ्या मुलीची हत्या केली. त्याने माझे सर्व काही उद्ध्वस्त केलं. मला न्यायाची अपेक्षा आहे.”
प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर सिद्धेश्वर प्रसाद यांनी रांचीमध्येच निवेदिता यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यानंतर ते घरी परतत असताना पोलिसांनी त्यांना फोन करून अंकितच्या आत्महत्येची माहिती दिली.
 
या घटनेबाबत माजी मुख्यमंत्री आणि भाजप विधीमंडळ पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी सरकारवर टीका केली आहे.
 
“रांचीच्या एका उच्चभ्रू भागात भरदिवसा एका मुलीची हत्या हे सिद्ध करते की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली नाही. मुलींवरील अत्याचाराच्या बातम्या रोज समोर येत आहेत. पण मुख्यमंत्र्यांना याबाबत काहीही फरक पडत नाही असं दिसतंय,” असं मरांडींनी ट्वीट केलंय.
 
Published By- Priya Dixit