1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 28 मार्च 2023 (14:49 IST)

गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्दः मराठा आरक्षणाला विरोध ते ST आंदालनाला पाठिंबा देण्याचा प्रवास

gunratna sadavarte
मराठा आरक्षणाला न्यायालयात केलेला विरोध असो की सध्या सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन. अॅड. गुणरत्न सदावर्तेंची चर्चा नेहमीच माध्यमात असते. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द झाली आहे. अँड. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळे ही सनद रद्द झाली आहे. त्यांनी मागच्यावर्षी पार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रला तक्रार केली होती. वकीली करतानाच्या नियमांचं उल्लघंन सदावर्ते यांनी अनेकदा केलं . एसटी आंदोलनात त्यांनी वकीलांचा ड्रेस परिधान करून आझाद मैदानात नाच केला होता. त्यानंतर त्यांनी एक बैठक बोलवूनही बार काऊंसिल ऑफ इंडियाच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं असं या तक्रारीत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर वर्षभराने याचा निकाल बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रने दिला आहे. सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली आहे.
 
मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. पाटील यांच्या बाजूने सदावर्ते न्यायालयात बाजू मांडत होते.
 
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उडी घेत एसटी कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सदावर्ते दाखल झाले होते. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनचे सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देत असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच एसटी कर्मचाऱ्यांना हे आंदोलन पुढे चालू ठेवायचं असेल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत असं देखील त्यांनी म्हटलं होतं.
 
पडळकर आणि खोत यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी अॅड. गुणवरत्न सदावर्ते हे विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम होते.
 
"गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना एसटी महामंडळाचा कर्मचारी या आंदोलनातून आझाद करत आहे. या दोघांनी स्थगिती देऊन टाकली. आम्ही या स्थगितीला नाकारत आहोत," असं सदावर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
 
''शरद पवार, अजित पवार, अनिल परब यांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी जे राजकारण केलंय, त्यात ते नापास झालेत. कालच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांनी फक्त विलीनीकरणाचा मुद्दा मांडला. पण, त्यांचं ऐकून घेण्यात आलं नाही. आम्ही अनिल परब यांचा राजीनामा मागत आहोत. 26 नोव्हेंबरला संविधान आंदोलन परिषद साजरी केली जाईल'' असंही सदावर्तेंनी म्हटलं होतं.
 
अॅड. गुणरत्न सदावर्ते कोण आहेत?
गेल्या काही वर्षांपासून अॅड गुणवरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेला कायदेशीर लढा असो की सध्या सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी घेतलेली उडी असो. सदावर्ते यांनी अशा अनेक केसेस न्यायालयात लढल्या आहेत.
 
अॅड. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण ओरंगाबाद आणि मुंबईतून झालं आहे. विविध सामाजिक चळवळींमध्ये ते नेहमीच पुढे असायचे. त्यांनी नांदेडला 'सम्यक विद्यार्थी आंदोलन' ही संघटना सुरू करुन या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले होते.
 
पुढे सदावर्ते मुंबईत स्थायिक झाले आणि मुंबईत वकिली करू लागले. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी केली आहे. मॅटच्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले आहेत. ते बार कॉऊंसिलच्या शिखर परिषदेवर देखील होते.
 
मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याची याचिका न्यायालयात दाखल करणाऱ्या अॅड. जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. त्यांना झेन नावाची मुलगी आहे.
 
22 ऑगस्ट 2018 रोजी परळच्या क्रिस्टल प्लाझा या इमारतीला आग लागली होती. त्यावेळी 10 वर्षाच्या झेन सदावर्ते हिने तिथे अडकलेल्या लोकांना सावधगिरीचे उपाय सुचवले. त्यामुळे 17 जणांचे प्राण वाचले होते. तिच्या या कार्याबद्दल तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे.
 
केवळ मराठा आरक्षाणावरील याचिकाच नाही तर अंगणवाडी सेविकांमुळे मुलांची होणाऱ्या आबाळाची केस, ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस, मॅटच्या माध्यमातून चार हजार परिचारिकांना नोकरीत कायम करण्याची केस, हैद्राबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका अशा अनेक केसेस सदावर्ते यांनी लढवल्या आहेत.
 
मराठा आरक्षणाला शेवटपर्यंत विरोध करत राहणार - सदावर्ते
मराठा आरक्षणाला शेवटपर्यंत विरोध करत राहणार असल्याचे सदावर्ते यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
 
''मराठा आरक्षणासाठी 52 मोर्चे निघाले. या मोर्चांमध्ये कुठेही वेदना नव्हत्या. हे मोर्चे साखर कारखान्यातले लोक, राजकीय लोकांच्या मदतीने काढलेले होते. त्यामुळे सुप्रिम कोर्टाचा निर्णय योग्य आहे आणि आमचा विजय आहे. जातीच्या विरुद्ध घाणेरड्या राजकारणाचा आज पराभव झाला आहे,'' असं देखील या मुलाखतीत सदावर्ते म्हणाले होते.
 
अॅड. गुणवरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला
मराठा आरक्षणाच्या सुनावनीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर 10 डिसेंबर 2018 ला हल्ला करण्यात आला होता.
 
मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेच्या सुनावणीच्या कामाकाजाबद्दल सदावर्ते माध्यमांना माहिती देत होते. त्यांतर सदावर्ते परतण्यासाठी निघाल्यावर एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत वैजनाथ पाटील नावाच्या व्यक्तीने सदावर्ते यांच्यावर हल्ला केला.
 
तसेच सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका का केली असा प्रश्न करत पाटील याने शिवीगाळ देखील केली होती.
 
सदावर्ते यांच्या सोबत असलेल्या इतर वकिलांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर इतरांनी त्याला चोप देखील दिला होता. उच्च न्यायालयाच्या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी पाटील याला नंतर ताब्यात घेतले होते.
 
जोपर्यंत एसटीच राज्य सरकारमध्ये विलनीकरण होत नाही तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नाही अशी भूमिका आता अॅड. सदावर्ते यांनी मांडली आहे.
 
सदावर्ते यांचा एसटी कामगारांच्या आंदोलनात संबंध काय?
आझाद मैदानावर सदावर्तेंनी एक मराठा लाख मराठाच्या ज्या घोषणा दिल्या त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
"गुणरत्न सदावर्ते यांचा एसटी कामगारांच्या आंदोलनाचा काय संबंध?' असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
 
"एसटी कामगारांच्या आंदोलनात एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन सदावर्ते मराठा आरक्षणावर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. मराठा आरक्षणाची टिंगल ते करत आहेत. सदावर्ते यांनी मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी पाठपुरवठा केला होता. सुडबुद्धीच्या राजकारणात एस. टी. कामगारांचे आंदोलन भरकटवले जात आहे," असं देखील शिंदे म्हणाले.
 
'एक मराठा लाख मराठा कोणाच्याही मालकीची घोषणा नाही' - सदावर्ते
एसटीच्या आंदोलनात सदावर्ते यांनी 'एक मराठा लाख मराठा' ही घोषणा दिल्याने त्यांच्यावर टीका देखील होऊ लागली. सदावर्ते यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत बीबीसी मराठीने सदावर्ते यांच्याशी बातचीत केली.
 
बीबीसी मराठीशी बोलताना सदावर्ते म्हणाले, "मी साहित्याचा अभ्यासक आहे. एक मराठा लाख मराठा ही घोषणा प्रेरणादायी आहे. 'मराठा' हा शब्द जातीवर आधारीत नाही तर भाषेवर आधारीत आहे. ही कोणाच्याही मालकीची घोषणा नाही. या आंदोलनात कुठलीही जात, धर्म नाही.''
 
आंदोलनातील सहभाग प्रसिद्धीसाठी आहे का?
सदावर्ते यांचा एसटी आंदोलनाशी काय संबंध ? असा आरोप त्यांच्यावर केला जातोय, या आरोपाला उत्तर देताना सदावर्तेंनी म्हटलं होतं, ''मी राज्यघटनेवर पी. एच. डी केली आहे. मी कष्टकऱ्यांच्या अनेक केसेस लढल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मला माझ्या वडिलांसारखे आहेत.
 
"आंबेडकर एकीकडे चवदार तळ्याचा सत्याग्रह करत होते तर दुसरीकडे न्यायालयात खटलेही लढत होते. तसंच ते संविधानही लिहीत होते. गांधी देखील चळवळ ही करत होते आणि वकिलीही करत होते. यापूर्वी अनेक चळवळींच नेतृत्व मी केलं आहे.''
 
सदावर्ते यांच्यावर ते प्रसिद्धीसाठी आंदोलनात सहभागी होतात असा देखील आरोप केला जातो, त्याविषयी स्पष्टीकरण देताना सदावर्ते म्हणाले, ''पराभूत मानसिकतेतून मी प्रसिद्धीसाठी आंदोलनांमध्ये भाग घेतो असं म्हंटलं जातं. आजपर्यंत मी लढलेल्या 99 टक्के केसेस मी जिंकल्या आहेत.
 
Published By- Priya Dixit