शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

चोरांनी 25 मिनिटांत परत ठेवली चोरीची बाईक

ग्वाल्हेर- एका प्रॉपर्टी डिलरच्या घरात घुसून तीन चोरट्यांनी पोर्चमध्ये उभी केलेली बाईक लॉक तोडून चोरली. ही बाईक स्टार्ट न करता त्यांनी सुमारे शंभर पावले अंतरावर नेली. नंतर त्यांनी ही बाईक स्टार्ट करण्याचा 25 मिनिटे जीवापाड प्रयत्न केला, पण बाईकने त्यांना दाद दिली नाही. ही बाईक स्टार्ट होत नाही असे दिसल्यावर चोरट्यांनी बाईक घराजवळ आणून सोडली आणि पळ काढला!
 
ही सर्व घटना रात्री सव्वातीनच्या सुमारास घडली आणि त्याचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्‍याने केले. घरमालकाने बाईक घराबाहेर उभी असलेली पाहून कॅमेर्‍याचे फुटेज पाहिले व पोलिसांना वर्दी दिली. या बाईकचे हँडल लॉक तुटलेले आहे हे त्यांनी पाहिले होते व त्यावरूनच बाईक चोरीचा प्रयत्न झाला असावा हे त्यांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले. त्यामध्ये चेहर्‍यावर रूमाल बांधलेल्या या तीन चोरांचे कृत्य आणि त्यांची फजिती समोर आली.
 
बाईक स्टार्ट होत नाही असे दिसल्यावर आधी चोरांना वाटले की पेट्रोल संपले असावे. मात्र, पेट्रोल असूनही बाईक स्टार्ट होत नाही असे दिसल्यावर या तिघांपैकी एकाने बाईक चालवत आणून घराजवळ लावली आणि तिघे आल्या पावली परतले!