शनिवार, 28 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified सोमवार, 13 जून 2022 (22:07 IST)

नुपुर शर्मा: मोहम्मद पैगंबरांवरील वादग्रस्त विधानावरून रांचीमध्ये हिंसाचार कसा उफाळला?

मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर झारखंडची राजधानी रांचीमध्ये 10 जून रोजी उफाळलेल्या हिंसाचाराच्या अनेक व्हिडियो क्लीप व्हायरल झाल्या आहेत.
 
यापैकी एका क्लीपमध्ये रस्त्यावर एकटा चालणारा एक किशोरवयीन मुलगा दिसतोय. त्याच्या हातात कुठलंच शस्त्र नाही. त्याच्या मागे चालत असलेले काही लोक 'इस्लाम जिंदाबाद' अशी नारेबाजी करतात.
 
तो महात्मा गांधी मार्गवरच्या डिव्हायडरवर चढतो. तेवढ्यात समोरून एक गोळी येते आणि थेट त्याच्या डोक्यात लागते. तो तिथेच कोसळतो. त्याचवेळी त्याच्या मागे चालत असलेले काही तरुण पुढे येतात आणि मग आवाज येतो - 'भाई ये मर गया. ये मर गया भाई'.
 
रात्रीपर्यंत ही बातमी पसरते की संबंधित मुलाचं नाव मुद्दसिर आहे. 15 वर्षांचा मुद्दसिर हिंदपीडीच्या राईन मोहल्ल्यात राहाणाऱ्या परवेझ आलम यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला उपचारांसाठी राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थेत (RIMS) दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
 
मध्यरात्रीनंतर त्याचा मृत्यू होतो.
 
रिम्समध्येच उपचार सुरू असलेल्या 24 वर्षांच्या साहिलचाही त्याच दिवशी मृत्यू झाला. रात्रीच पोस्टमॉर्टेमही झालं आणि पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी दोघांवरही वेगवेगळ्या दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
गोळी लागून 10 जण जखमी
मोहम्मद पैगंबरांवरील वादग्रस्त विधानाविरोधात रांचीमध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार उफाळला आणि त्यात 10 जण गोळी लागून जखमी झाले. त्यात या दोघांचाही समावेश आहे.
 
बीबीसीला रिम्समधून मिळालेल्या कागदपत्रांनुसार 10 जणांना बुलेट इंज्युरी झाल्याचं कळतं. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर सरफराज, तबारक, उस्मान, अफसर, साबीर आणि शाहबाज यांच्यावर पुढचे आणखी काही दिवस हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू रहाणार आहेत. हे सर्व जखमी 15 ते 30 वयोगटातले आहेत.
 
झारखंड पोलीस प्रवक्ते ए. व्ही. होमकर यांनी सांगितले की एका पोलीस कर्मचाऱ्यालाही गोळी लागली आहे. रिम्समधल्याच ऑर्थो वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
 
हिंसाचार कसा उफाळला?
10 जूनच्या दुपारी शुक्रवारच्या नमाजनंतर मुस्लीम समुदायाने भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी करत मेन रोडवरून मोर्चा काढला.
 
यातल्या काहींच्या हाती धार्मिक झेंडे होते, तर काहींच्या हातात काळे झेंडे होते. मोर्चेकरी हनुमान मंदिरापर्यंत शांततेत त्यांच्या मागण्यांच्या घोषणा देत चालत होते.
 
मात्र, तेवढ्यात मोर्चात सामील काही लोकांनी हनुमान मंदिरावर दगडफेक सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. मोर्चातल्याच काहींनी या दगडफेक करणाऱ्यांना परत जाण्यास सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही.
 
बंदोबस्तासाठी तैनात पोलीस सुरुवातीला शांत होते. पण, काही वेळातच पोलिसांनी गोळीबार सुरू केला. यानंतर मोर्चात सहभागी असणारे लोक अधिकच हिंसक झाले.
 
मोर्चेकऱ्यांच्या दगडफेकीत एका पोलिसाच्या डोक्याला दगड लागून जोरदार मार लागला. एसएसपीही जखमी झाले आणि इतरही पोलीस कर्मचाऱ्यांना मार लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारत 12 पोलीस कर्मचाऱ्यांसह 24 जण जखमी झालेत.
 
मोर्चा कुणाच्या सांगण्यावरून निघाला?
अंजुमन इस्लामियाचे प्रमुख अबरार अहमद यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार हा मोर्चा उत्स्फूर्तपणे काढण्यात आला होता. कुठल्या संघटनेने किंवा कुणी या मोर्चाचं आवाहन केलं, हे कुणालाच माहीत नाही.
ते म्हणाले, "पूर्वी आम्ही धार्मिक निदर्शनं करायचो त्यावेळी पोलीस आणि प्रशासनाला त्याची पूर्वकल्पना द्यायचो. जमाव हिंसक झाला, असं कधीही घडलं नाही. इथे कायमच शांततेचं वातावरण होतं आणि सर्व प्रश्न संवादातून सौहार्दपूर्ण वातावरण सोडवण्यात यायचे. एवढा मोठा गदारोळ पहिल्यांदाच झाला आहे."
 
पोलिसांना निदर्शनाची माहिती होती का?
असा मोर्चा निघणार, याची पूर्वसूचना देण्यात आली होती की नाही, हे पोलिसांनीही उघड केलेलं नाही. मात्र, हा मोर्चा निघण्याच्या तासभर आधीच पोलिसांनी याच रस्त्याने फ्लॅग मार्च काढला होता.
 
त्यामुळे डेली मार्केट दुकानदार संघाने दुकानं बंद ठेवण्याची घोषणा आधीच केली होती. शुक्रवार सकाळपासूनच दुकानं बंद होती. इथे प्रामुख्याने फळ बाजार भरतो आणि बहुतांश दुकानदार मुस्लीम समाजातले आहेत. ते सर्वही मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या विधानाने दुखावले होते.
 
पोलिसांनी गोळीबार का केला?
रांचीचे उपायुक्त (डीसी) छवीरंजन आणि एसएसपी सुरेंद्र कुमार झा यांनी रविवारी या प्रकरणी एक पत्रकार परिषद घेतली होती. तत्कालीन परिस्थितीनुरूप गोळीबाराचा निर्णय घेणं योग्यच होतं, असं यावेळी सांगण्यात आलं. आम्ही आधी खबरदारी घेतली आणि नंतरच गोळीबाराचा निर्णय घेतल्याचं डीसींचं म्हणणं आहे.
 
एसएसपी सुरेंद्र कुमार झा मीडियाशी बोलताना म्हणाले, "आम्ही कुठल्या क्षणी कुठला निर्णय घ्यावा, याचं आम्हाला प्रशिक्षण देण्यात येतं. आम्हाला लोकांची सुरक्षा करायची असते आणि शहरातलं वातावरण बिघडू नये, याची काळजी घ्यायची असते. अशा वेळी कुठल्या वेळी कुठली अॅक्शन घ्यायची, याचं आम्हाला प्रशिक्षण मिळतं. त्यानुसारच गोळीबाराचा निर्णय घेण्यात आला. यामुळे मोठी हानी टळली आहे."
 
पोलिसांनी गोळीबार करण्याआधी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या नाही आणि वॉटर कॅननचाही वापर केला नाही. भडकलेला जमाव पांगवण्यासाठी सामान्यपणे पोलीस आधी या उपाययोजना करतात.
 
शुक्रवारच्या हिंसेच्या वेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या का? पाण्याचा मारा केला का? लाउडस्पीकरवरून इशारा देण्यात आला होता का?
 
पत्रकार परिषदेत हे सर्व प्रश्नही विचारण्यात आले होतो. मात्र, कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी गोळीबार करणं भाग पडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
इशारा न देताच गोळीबार करणं योग्य आहे का?
झारखंड आणि बिहारमध्ये महत्त्वाची पदं भूषवलेले सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी रामचंद्र राम यांच्या मते रांची पोलिसांनी योग्य निर्णय घेतला.
 
ते म्हणाले, "जमाव हिंसक झाला आणि इतर कुठलाच उपाय उरला नसेल तर अशा परिस्थितीत पोलिसांनी काय करावं? जीवितहानी टाळण्यासाठी पोलिसांनी योग्यच निर्णय घेतला. आम्ही जे व्हीडिओ बघत आहोत त्यात रांची पोलिसांनी केलेली कारवाई प्रथमदर्शनी योग्यच असल्याचं दिसतं. तो जमाव फारच हिंसक बनला होता."
 
मात्र, सामाजिक कार्यकर्ते असलेले नदीम राय यांचं मत वेगळं आहे.
 
ते बीबीसीशी बोलताना म्हणाले, "पोलीस कधीही थेट गोळीबार करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे शांततामय पद्धतीने सुरू असलेला जमाव अचानक हिंसक कसा झाला, हा तपासाचा विषय आहे. दुसरं म्हणजे पोलिसांनी पाण्याचा मारा, रबर बुलेट, अश्रूधूर आणि लाठीचार्ज असे उपाय का केले नाही? विशेष म्हणजे या निदर्शनाची पूर्वकल्पना असूनही पोलिसांनी हे सगळं का केलं नाही?"
 
ते पुढे म्हणतात, "माझ्याकडे पक्की माहिती आहे की शुक्रवारी सकाळी डेली मार्केट ठाण्याचे प्रभारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुकानदारांसोबत बैठक घेतली होती आणि तुम्ही दुकानं बंद ठेवू शकता, पण निदर्शनं किंवा मोर्चा काढू नका, असं सांगितलं होतं. लोकांनी त्यांचं म्हणणं ऐकलं होतं आणि दुकानं बंद ठेवू, पण निदर्शनं करणार नाही, असं आश्वासनही दिलं होतं."
 
"पोलिसांनी तेव्हाच सावध व्हायला हवं होतं. या निदर्शनाच्या बातम्या वृत्तपत्रांमध्येही झळकल्या. त्यामुळे हे सगळं अचानक घडलं, असं पोलीस म्हणू शकत नाही. पोलिसांनी जाणीवपूर्वक लोकांना टार्गेट करून गोळीबार केला. याचा पुरावा म्हणजे काली मंदिराजवळच्या इलेक्ट्रिसिटी खांबाला लागलेली ती गोळी आहे. माणसाएवढ्या उंचीवर ती गोळी लागली आहे. अनेकांना शरीराच्या वरच्या भागात गोळ्या लागल्या आहेत. त्यामुळे पोलिसांवरही धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रभाव तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो."
 
सरकारवर प्रश्नचिन्ह
माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बाबूलाल मरांडी या संपूर्ण घटनेसाठी सरकारला जबाबदार धरतात.
 
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "रांचीमध्ये घडलेला हिंसाचार हा पूर्णपणे हेमंत सोरेन सरकारचं अपयश आहे. एवढी मोठी घटना अचानक घडली का? सरकारने आधीच आवश्यक निर्देश दिले असते आणि प्रशासनाने त्यानुसार उपाययोजना केल्या असत्या तर समाजविघातक तत्त्वांचं धाडसच झालं नसतं.
 
गोळीबाराची गरजच पडली नसती. जमावाचा एक स्वभाव असतो. त्या दिवशी मी रांचीमध्ये नव्हतो. पण, मला जी माहिती मिळाली आणि मी जे फुटेज बघितलं त्यावरून हे स्पष्ट होतं की घटनास्थळी पोलिसांची संख्या खूप कमी होती. हिंदू समाजाने विरोध केला नव्हता. मग मुस्लीम समाजाचे लोक इतके का भडकले, हा मोठा प्रश्न आहे."
 
बाबूलाल मरांडी पुढे म्हणतात, "मला तर वाटतं हा सरकार प्रायोजित हिंसाचार आहे. ईडी आणि इतर तपास यंत्रणांद्वारे मुख्यमंत्री आणि त्यांच्या निकटवर्तीयांविरोधात सुरू असलेल्या कारवाईवरून लक्ष वळवण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक हा हिंसाचार घडवून आणला. आता त्या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे."
 
सरकारकडून तपास सुरू
झारखंड सरकारमध्ये असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांनी या घटनेविषयी बोलताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेच्या तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती सात दिवसात आपला अहवाल देईल. त्याआधारे सरकार पुढचा निर्णय घेईल.
 
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "तपासातूनच सत्य बाहेर येईल. कुठलंही संवेदनशील सरकार तपास न करताच निर्णय कसा घेऊ शकते. या मुद्द्यावरून राजकारण करू नये, असं आवाहन मी करतो. याबाबत केलेली बेताल वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाही. ही दुःखद घटना आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सरकार संवेदनशीलपणे प्रकरण हाताळत आहे. कुठलीही संस्था किंवा संघटनेने राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये."
 
पोलिसांवर हत्येचा आरोप
हिंसाचारात गोळी लागून ठार झालेल्या मुद्दसिरचे वडील परवेझ आलम यांनी दाखल केलेल्या तक्रारीत काही पोलीस कर्मचाऱ्यांवर मुलाला ठार केल्याचा आरोप केला आहे. याची एक प्रत बीबीसीकडेही आहे.
 
रस्त्यावर तैनात पोलिसांनी गोळीबार केला आणि तेव्हाच जमावातल्या काहींनी दगडफेक सुरू केली आणि त्यामुळे अफरातफरी माजल्याचं परवेझ आलम यांनी तक्रारीत म्हटलं आहे. याच अफरातफरीत गोळी लागून मुद्दसीरचा मृत्यू झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.