रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रपती निवडणूक
Written By
Last Updated : मंगळवार, 28 जून 2022 (13:28 IST)

राष्ट्रपतीपदाची निवडणूक नेमकी कशी होते? 11 प्रश्नांची उत्तरं

rashatrapati bhawan
देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ आता समाप्त होत आला आहे. परिणामी आता नव्या राष्ट्रपतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे.
 
रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै 2017 रोजी भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.
 
भारताच्या राष्ट्रपतींची निवड नेमकी कशी होते त्याबाबतच्या 11 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत.
 
1. राष्ट्रपतीपदाची निवडणूक नेमकी कशी होते?
राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. ज्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि देशातल्या सर्व विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो.
 
विधान परिषदेच्या सदस्यांचा यामध्ये समावेश होत नाही. तसंच राज्यसभा आणि लोकसभेत नियुक्त करण्यात आलेले सदस्य या मतदान प्रक्रियेचा भाग नसतात.
 
महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मताचं मूल्य वेगवेगळं असतं. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या मताचं मूल्य एक सारखंच असतं. पण वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांच्या आमदारांच मूल्य वेगवगेळं असतं. ते त्या त्या राज्यांच्या लोकसंख्येवर अवलंबून असतं.
 
याचा अर्थ असा आहे की उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल अशा राज्यातील एका आमदाराच्या मताला जास्त वेटेज तर मणिपूर, गोवा, त्रिपुरा सारख्या लोकसंख्येनी लहान असलेल्या राज्यांतील आमदारांच्या एका मताला कमी वेटेज असतं.
 
उत्तर प्रदेशातील एका आमदाराला 208 इतकं वेटेज असतं तर देशातील प्रत्येक खासदाराला 708 इतके वेटेज असतं.
 
2. महाराष्ट्रातील एका आमदाराच्या मताचं मूल्य किती?
त्या त्या राज्यातल्या आमदारांचं वेटेज किती आहे हे ठरवण्यासाठी त्या त्या राज्यांची लोकसंख्या एकूण आमदारांच्या संख्येनं भागली जाते. अशा प्रकारे प्राप्त झालेल्या संख्येला नंतर परच 1000 नं भागलं जातं. त्यातून जो आकडा उत्तर म्हणून येतो तो त्या राज्यातील आमदाराच्या मताचं वेजेट असतं. यासाठी 1971 ची जगगणना आधार मानली जाते.
 
1971 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या पाच कोटी, चार लाख होती. म्हणजेच 5 कोटी चार लाख भागिले 288 त्यातून येणाऱ्या संख्येला 1000 ने भागल्यानंतर 175 आकडा येतो म्हणजेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या मतांचं मूल्य हे 175 आहे.
 
भारतात एकूण 776 खासदार आहेत. त्यांचे वेटेज 5 लाख 49 हजार इतके आहे. भारतात विधानसभेतील आमदारांची संख्या 4120 इतकी आहे. त्यांचे वेटेज 5,49,474 इतके आहे. दोन्ही समूहांचे एकत्रित मतदान 10,98,882 इतके आहे. म्हणजेच अंदाजे 11 लाख.
 
या निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा वापर होत नाही.
 
3. इतर राज्यांतील आमदारांचं मूल्य किती?
उत्तर प्रदेश - 208
केरळ - 152
मध्य प्रदेश - 131
कर्नाटक - 131
पंजाब - 116
बिहार - 173
गुजरात - 147
झारखंड - 176
ओडिशा - 149
 
4. दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांना सारखीचं मतं मिळाली तर?
याबद्दल भारतीय संविधानात काहीच सांगण्यात आलेलं नाही. भारतीय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडीसाठी 1952 मध्ये कायदा करण्यात आला आहे, त्यातसुद्धा याबद्दल स्पष्टता नाही. अशी स्थिती तापर्यंत उद्भवलेली नाही हेही खरं आहे.
 
5. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यावर राजकीय कारकिर्द संपुष्टात येत? पुन्हा निवडणूक लढवता येत नाही?
 
राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्यांना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवता येते. संविधानात याबाबत स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे.
 
तसंच कार्यकाळ संपल्यानंतर राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याचा प्रश्न नाही. राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर ती व्यक्ती पाहिजे तर राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू शकते.
 
पण हेही तितकच खरं आहे की देशाचं सर्वेच्च पद भूषवल्यानंतर ती व्यक्ती राज्यपाल, खासदार किंवा आमदार होणं पसंत करणार नाही. कारण ही सर्व पदं राष्ट्रपतीपदापेक्षा कनिष्ठ आहेत.
 
6. भारतात सर्व अधिकार पंतप्रधानांकडे असतात मग राष्ट्रपतीपद का महत्त्वाचं?
भारतात असं नाही की सर्वच्या सर्व अधिकार पंतप्रधानांकडे असतात. प्रत्येकाच एक कार्यक्षेत्र आहे. राष्ट्रपतींच्या हातात संपूर्ण कार्यपालिकेचे अधिकार असतात, ज्यांचा वापर ते स्वतः किंवा त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करू शकतात.
 
राष्ट्रपतींची प्रमुख जबाबदारी ही पंतप्रधानांची नियुक्ती आणि संविधानाचं रक्षण करणं आहे. हे काम ते त्यांच्या विवेकाने करतात. कुठलाही आधिनियम त्यांच्या मंजुरीशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. वित्तविधेयक सोडून ते इतर कुठलंही विधेयक पुर्नविचारासाठी संसदेला परत पाठवू शकतात.
 
7. राष्ट्रपतीपदाची निवडणूक कोण लढवू शकतं?
राष्ट्रपतीपदाची उमेदार व्यक्ती भारताची नागरिक असावी. त्या व्यक्तीचं वय कमीतकमी 35 असावं.
 
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच्या सर्व पात्रतांची पूर्तता केलेली असावी.
 
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी सादर करण्यासाठी पन्नास इलेक्टोरल कॉलेज प्रस्तावक आणि पन्नास इलेक्टोरल कॉलेज अनुमदेक गरजेचे असतात.
 
संघराज्यांच्या कार्यकारी अधिकारींची पूर्तता करणे हे राष्ट्रपतींचं मुख्य कर्तव्य आहे. लष्कराच्या प्रमुखांची नियुक्तीसुद्धा राष्ट्रपती करू शकतात.
 
8. राष्ट्रपतींना पदावरून कसं हाटवलं जाऊ शकतं?
राष्ट्रपतींवर महाभियोग चालवून पदच्युत करता येऊ शकतं. यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. या प्रस्तावावर एक चतुर्थांश सदस्यांची सही असणं गरजेचं असतं. त्यानंतर सभागृहात त्यावर चर्चा होते.
 
हा प्रस्ताव पारित करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात दोनतृतियांश मतं मिळवण्याची गरज असते. संसदेच्या दोन्ही सभागृहात दोनतृतीयांश मतांनी हा प्रस्ताव पारित झाला तर राष्ट्रपती पदावरून पदच्युत झाल्याचं मानलं जातं.
 
9. किती उमेदवार निवडणूक लढवू शकतात?
दोन पेक्षा जास्त उमेदवार ही निवडणूक लढवू शकतात. पण त्यांनी उमेदवारीसाठीचे 50 प्रस्तावक आणि 50 अनुमोदक इलेक्टोरल कॉलेजची पुर्तता करावी ही अट आहे.
 
10. दयेच्या अर्जावर राष्ट्रपती स्वतः निर्णय घेतात का?
मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपती दयेच्या अर्जावर निर्णय घेऊ शकतात. पण मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना नेमका काय सल्ला दिला आहे हे कोर्टातसुद्धा विचारता येऊ शकत नाही.
 
11. राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे का?
आतापर्यंत डॉ. नीलम संजीव रेड्डी हे एकमेव राष्ट्रपती बिनविरोध निवडले गेले आहेत. तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे एकमेव राष्ट्रपती आहे जे दुसऱ्यंदा यापदी निवडले गेले होते.