शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (10:51 IST)

सय्यद अली शाह गिलानी : काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याचं निधन

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. दीर्घ आजाराने ग्रस्त असलेल्या गिलानी यांनी बुधवारी रात्री श्रीनगरमध्ये त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
 
गिलानी यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासनानं संपूर्ण काश्मीरमध्ये अलर्ट जारी केला आहे. गिलानी यांनी निधनानंतर त्यांचा दफनविधी श्रीनगरच्या 'शहिदांच्या स्मशानभूमीत' करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अलर्ट जारी केला आहे.
 
त्यांची इच्छा असलेल्या ठिकाणी त्यांचा दफनविधी करण्यास प्रशासन मान्यता देईल की नाही? हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.
 
गिलानी हे गेल्या वर्षी काश्मीरमधील विविध भारतविरोधी गटांची संघटना असलेल्या हुर्रियत कॉन्फरन्समधून बाहेर पडले होते. तसंच त्यांचे नीकटवर्तीय आणि हुर्रियतचे वारसदार अशी ओळख असलेल्या अश्रफ सेहरी यांचं यावर्षाच्या सुरुवातीला तुरुंगात कोरोनाचा संसंर्ग झाल्यानं निधन झालं होतं.
 
सध्या बंदी असलेल्या जमात-ए -स्लामीचं प्रतिनिधित्व करत गिलानी हे 15 वर्षं काश्मीरच्या 87 सदस्यांच्या विधानसभेचे सदस्य होते.
 
काश्मीरमध्ये सशस्त्र बंडखोरीला सुरुवात झाली त्यावेळी 1989 मध्ये त्यांनी जमातच्या इतर चार नेत्यांसह राजीनामा दिला होता. 1993 मध्ये आणखी इतर 20 धार्मिक आणि राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्यांनी मीरवाईझ उमर फारूख यांच्यासह ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सची स्थापना केली होती. मीरवाईज हे वयाच्या 19 व्या वर्षी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते.
 
त्यानंतर गिलानी यांची हुर्रियतच्या अध्यक्षपदी निवड झाली.
 
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी काश्मीरच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी चार सुत्री कार्यक्रम आखला होता. त्या माध्यमातून फुटीरतावाद्यांना दिल्ली म्हणजे भारत सरकारशी चर्चेसाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. पण त्यावेळी गिलानी आणि त्यांचे सहकारी यांनी हुर्रियतमधून बाहेर पडत 2003 मध्ये त्याच नावाची वेगळी संघटना सुरू केली होती.
 
त्यानंतर हुर्रियत (जी) या संघटनेचे आजीवन अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
 
या दोन्ही संघटनांमध्ये तणावाचे संबंध होते. त्याचं कारण म्हणजे मीरवाईझ उमर फारुख यांच्या नेतृत्वातील गटानं भारत सरकारशी चर्चेचं समर्थन केलं. तसंच काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याबाबतही त्यांची मवाळ भूमिका होती. तर संयुक्त राष्ट्रांच्या सूचनेनुसार जनमत चाचणी होण्यापूर्वी निवडणुका किंवा कोणत्याही चर्चांना गिलानी यांच्या गटाचा तीव्र विरोध होता.
 
गिलानी यांच्या निधानावर मेहबुबा मुफ्ती यांनी शोक व्यक्त केला आहे. "अनेक मुद्द्यांवर आमचं एकमत नव्हतं. मात्र त्यांची एकनिष्ठता आणि भूमिकेवर ठाम राहणं यासाठी मी त्यांचा आदर करते," असं मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटलंय.
 
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही गिलानी यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे. गिलानी हे आयुष्यभर काश्मीरचं स्वातंत्र्य आणि येथील लोकांच्या हक्कासाठी झगडत राहिले, असं इम्रान खान म्हणाले. भारतानं त्यांना तुरुंगवास दिला, छळ केला, असे आरोपही इम्रान यांनी केलेत. गिलानी यांच्या निधनामुळं पाकिस्तानचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवला जाणार असून, पाकिस्तानात एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार असल्याचंही, इम्रान म्हणालेत.