शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (16:36 IST)

दिल्लीत : महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन, राहुल गांधी-प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने देशव्यापी निदर्शन सुरू केली आहेत. याच निदर्शनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्रियांका गांधींनी रस्त्यावर धरणं आंदोलन सुरू केलय.
 
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी काँग्रेस मुख्यालयाजवळील सुरक्षा कवच तोडून बॅरिकेडवरुन उडी मारत पुढे जात होत्या. मात्र त्यांना तिथंच थांबवण्यात आल्यानं त्या रस्त्यावरच ठाण मांडून बसल्या.
 
तर दुसरीकडे राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसने एक व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका बसमध्ये दिसत असून त्यांच्यासोबत खासदार इम्रान प्रतापगढीही दिसतायत.
 
काँग्रेस मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून प्रियांका गांधी रस्त्यावर बसलेल्या दिसत आहेत.
 
पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी काही खासदारांना ओढून मारहाण केल्याचा आरोप राहुल गांधींनी यावेळी केलाय.
 
वाढती महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसने ५ ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की जे घाबरतात तेच धमक्या देतात. येत्या काळात काँग्रेसवरील हल्ले वाढतील पण त्यामुळे त्यांना सक्षम बनण्यास मदत होईल असं ही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
 
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व खासदार आणि नेत्यांनी निषेध नोंदवण्यासाठी काळे कपडे घालून संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता. पण हा मोर्चा वाटेतच अडवण्यात आला.