भारताची तालिबानसोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली जाणून घ्या...  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार भारताने तालिबानशी चर्चा केली आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर भारताने तालिबानशी अधिकृतपणे चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परताव्यावर आणि अफगाणिस्तानबद्दल भारताच्या चिंतांवर या चर्चेचा भर होता. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की 31 ऑगस्ट रोजी कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या दोहा राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास त्सतेकझाई यांची भेट घेतली. तालिबानच्या विनंतीवरून दोहा येथील भारतीय दूतावासात ही चर्चा झाल्याचे भारताने म्हटले आहे.
				  													
						
																							
									  
	 
	बैठकीत काय चर्चा झाली?
	अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर आणि त्यांच्या भारतात परतण्यावर चर्चा केंद्रित झाली आहे. भारतद्रोही कारवाया आणि दहशतवादासाठी अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही प्रकारे वापरू नये अशी चिंता राजदूत मित्तल यांनी व्यक्त केली आहे. भारताच्या या समस्यांबाबत, शेर मोहम्मद अब्बास त्सतेकझाई यांनी आश्वासन दिले आहे की हे प्रश्न सकारात्मक दृष्टिकोनाने सोडवले जातील.
				  				  
	 
	अलीकडच्या काळात तालिबान नेत्यांनी अनेक वेळा म्हटले आहे की भारत आमच्या साठी एक महत्त्वाचा देश आहे आणि आम्हाला भारताशी चांगले संबंध हवे आहेत. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुंतवणुकीचे स्वागत केले आहे आणि म्हटले आहे की भारत अफगाणिस्तानमधील प्रकल्पांवर काम करणे सुरू ठेवू शकतो. तालिबानने सातत्याने दावा केला आहे की अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही देशाविरुद्ध वापरली जाणार नाही.