1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Indore Jatra 2026 in Poddar Plaza

इंदोरमध्ये रंगला 'जत्रा २०२६' उत्सव: महाराष्ट्रीयन चवींची आणि संस्कृतीची धूम!

खाद्यप्रेमींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदोरमध्ये सध्या महाराष्ट्राच्या अस्सल पारंपरिक चवींची आणि संस्कृतीची मोठी जत्रा भरली आहे. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गांधी हॉल शेजारील पोद्दार प्लाझा येथे 'जत्रा २०२६ - मेगा ट्रेड फेयर आणि मराठी फूड फेस्टिवल'चे शानदार आयोजन करण्यात आले आहे. यंदा या लोकप्रिय महोत्सवाचे २६वे वर्ष असून, मराठी संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि व्यापाराचा हा एक अनोखा संगम ठरत आहे.
 
मराठी सोशल ग्रुप ट्रस्ट आणि मराठी समाज यांच्या वतीने आयोजित हा मेळावा रोज दुपारी २:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुला आहे.
 
झणझणीत मिसळ ते मऊसुत पुरणपोळी; ५०हून अधिक पदार्थांची रेलचेल
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे लावण्यात आलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. संपूर्ण इंदोरकरांना महाराष्ट्राच्या विविध भागांतील पारंपरिक चवींचा आस्वाद एकाच छताखाली घेता येत आहे. यात प्रामुख्याने खमंग व चमचमीत पदार्थ जसे गरमागरम झुणका-भाकर, पिठलं-भाकरी, कोल्हापुरी मिसळ-पाव, थालीपीठ तर गोडधोड मेजवानीमध्ये खमंग पुरणपोळी, उकडीचे मोदक आणि अनारसे आणि इतर थेट महाराष्ट्रीयन चव असलेले पदार्थ आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व पदार्थ महाराष्ट्रीयन कुटुंब आणि महिलांनी स्वतः पारंपरिक पद्धतीने तयार केले आहेत, ज्यामुळे पदार्थांना घरगुती आणि अस्सल चव मिळत आहे.
 
मेगा ट्रेड फेअर आणि सांस्कृतिक कार्यक्रम
खाद्यपदार्थांसोबतच येथे भव्य व्यापारी मेळावा (मेगा ट्रेड फेअर) देखील भरवण्यात आला आहे. या स्टॉल्सवर महाराष्ट्राच्या पारंपरिक साड्या, आकर्षक दागिने, गृहसजावटीच्या वस्तू आणि हस्तशिल्पांची मोठी खरेदी इंदोरी महिला करत आहेत. याशिवाय, संध्याकाळच्या वेळी लावणी, पारंपरिक लोकनृत्य आणि मराठी संगीताचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, ज्यामुळे पोद्दार प्लाझाचा संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला आहे. यंदा छायाचित्रकारांसाठी एक विशेष 'फोटोग्राफी कॉम्पिटिशन' देखील ठेवण्यात आले आहे.
'झिरो वेस्ट' आणि पर्यावरणपूरक आयोजन
इंदोरच्या स्वच्छतेच्या परंपरेला साजेसे असेच या जत्रेचे नियोजन आहे. इंदोर महानगरपालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हा महोत्सव पूर्णपणे 'झिरो लँडफिल' आणि 'नो सिंगल युज प्लास्टिक' (प्लास्टिकमुक्त) मोहीम राबवून आयोजित करण्यात आला आहे, ज्याचे स्थानिक प्रशासनाकडून कौतुक होत आहे.
पुढील लेख
LIVE: ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू