मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 1 सप्टेंबर 2018 (11:33 IST)

जैन मुनी तरूण सागर महाराज यांचे निधन

जैन मुनी तरुण सागर महाराज यांचे निधन झाले आहे. ते ५१ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते कावीळ या आजाराने त्रस्त असल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तरुण सागर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांनी उपचार थांबविण्याचा निर्णय घेतला. यानंतर तरुण सागर यांनी संथारा व्रत सुरू करण्याचा निर्धार करत रुग्णालयातून दिल्ली येथील राधापुरी जैन मंदिरात आले होते. आज पहाटे ३ वाजेदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मेरठ हायवे स्थित तरुणसागर तीर्थ याठिकाणी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
मुनी तरुण सागर यांचे मूळ नाव पवन कुमार जैन आहे. त्यांचा जन्म २६ जून १९६७ रोजी मध्य प्रदेशातील दमोह येथील गुहजी गावात झाला. त्यांच्या आईचे नाव शांतीबाई आणि वडिलांचे नाव प्रतापचंद्र आहे. मुनीश्री तरुण सागर यांनी ८ मार्च १९८१ रोजी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली. त्यांच्या देश-विदेशातील अनुयायांची संख्या मोठी आहे. तरुण सागर हे त्यांच्या प्रखर आणि कडव्या विचारांसाठी प्रसिद्ध होते. त्यांची काही वक्तव्ये वादग्रस्तही ठरली होती. मागील २० दिवसांपासून ते काविळीने त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांनी उपचार थांबविले व संथारा व्रत घेण्याचा निर्णय घेतला. संथारा ही एक उपवासाची एक पद्धत असून यामध्ये मृत्यूचा पूर्वाभास होताच अन्न आणि पाण्याचा त्याग करतात. मृत्यूपर्यंत हा उपवास सुरू असतो. जैन धर्मात याला मोक्ष प्राप्तीची प्रक्रिया मानली जाते.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत जैन मुनी तरुण सागर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.