सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 11 जानेवारी 2023 (21:07 IST)

जोशीमठ : ‘ज्यादिवशी मूर्तीचा हात तुटून पडेल त्यादिवशी तुझं साम्राज्य नष्ट होईल’

गढवाल हिमालयचे गॅझेटियर लिहिणारे इंग्रस आयसीएस अधिकारी एचजी वॉल्टन यांनी 1910 मधील जोशीमठचा उल्लेख केलाय.घरं, रात्रीचे निवारे, मंदिरं आणि चौकोणी आकाराच्या दगडांपासून तयार केलेला शहराचा चौक असलेलं शांत शहर, असा तो उल्लेख आहे. याच्या गल्ल्यांमध्ये कधीतरी व्यवसायाच्या हंगामात तिबेटमधून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या याक आणि घोड्यांच्या घंट्यांचा आवाज येत असावा, असं त्यात म्हटलंय. 
 
जुन्या काळात या व्यापाऱ्यांच्या वर्दळीमुळं जोशीमठ ही एक संपन्न बाजारपेठ असावी. पण वॉल्टन यांच्या कालखंडापर्यंत या व्यापाऱ्यांनी त्यांचे बाजार दक्षिणेकडे म्हणजे नंदप्रयाग आणि त्याच्याही पुढं स्थलांतरीत केले होते. 
 
वॉल्टन यांनी तिबेटच्या ज्ञानिमा मंडीमध्ये पिढ्यान् पिढ्या व्यापारासाठी जाणाऱ्या भोटिया व्यापाऱ्यांच्या मंड्यांच्या (बाजारांच्या) अवशेषांचा उल्लेखही केला आहे.
 
त्यांनी हे अवशेष जोशीमठमध्ये पाहिले होते. 
 
अलकनंदा नदीच्या वरच्या खोऱ्यात वसलेल्या जोशीमठची लोकसंख्या 1872 मध्ये 455 होती, ती 1881 मध्ये वाढून 572 झाली होती. 
 
सप्टेंबर 1900 मध्ये गणनेत हा आकडा 468 एवढा मोजण्यात आला.
 
पण तेव्हाच्या जनगणनेवेळी बद्रीनाथचे रावल आणि इतर कर्मचारी इथं उपस्थित नव्हते. 
उपस्थित नसलेले हे लोक तीर्थयात्रेच्या हंगामात म्हणजेच, नोव्हेंबरपासून ते मे महिन्याच्या मध्याच्या काळापर्यंत बद्रीनाथ मंदिरात राहून भाविकांच्या राहण्या-खाण्याची आणि पुजेची व्यवस्था करायचे. 
 
थंडीच्या हंगामात त्यांना जोशीमठला यावं लागायचं, कारण त्या काळात बद्रीनाथ बर्फाखाली दबल्यानं कवाडं बंद करावी लागतात. 
 
कर्णप्रयागपासून तिबेटपर्यंत जाणारा मार्ग चमोली, जोशीमठ आणि बद्रीनाथ मार्गे माणा खिंडीपर्यंत पोहोचतो. तर दुसरा एक मार्ग तपोवन आणि मालारीद्वारे निती खिंडीपर्यंत जातो. 
 
पारंपरिक दृष्ट्या बद्रीनाथच्या रावल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या थंडीच्या काळातील निवासासाठी जोशीमठचा विकास झाला.
 
पण गढवालला दूरच्या सीमेला लागून असलेल्या माणा आणि निती खोऱ्यांच्या महत्त्वाच्या वस्त्यांना जोडणाऱ्या मार्गातील एका महत्त्वाच्या टप्प्याचं रुपही त्यानं हळू-हळू घेतलं असावं. 
 
येथील रहिवाशांमध्ये पंडित, लहान-मोठे व्यापारी आणि शेतीची कामं करणारे सर्वसाधारण डोंगरी भागातील नागरिक यांचा समावेश होता. 
 
जोशीमठच्या उत्पत्तीची कहाणी 
उत्तराखंडच्या गढवालमधील पैनखंडा परगण्यात समुद्रसपाटीपासून 6107 फूट उंचीवर धौली आणि विष्णूगंगेच्या संगमापासून अर्धा किलोमीटर अंतरावर जोशीमठ आहे.
 
त्याच्या उत्पत्तीची कहाणी शंकराचार्यांशी संबंधित आहे.
 
शंकराचार्यांनी आठव्या आणि नवव्या शतकांमध्ये केलेल्या हिमालयाच्या यात्रांमुळं उत्तराखंडचा धार्मिक भूगोल व्यापक अर्थानं बदलून गेला होता. 
 
दक्षिण भारताच्या केरळ राज्यातील त्रावणकोरच्या एका लहानशा गावात जन्मलेल्या आदि शंकराचार्य यांनी वेदांत तत्वज्ञानाच्या प्रचार-प्रसाराच्या उद्देशानं अत्यंत कमी वयात मल्याळम पाळं मुळं त्यागत दूरवर असलेल्या हिमालयाच्या प्रदीर्घ यात्रा केल्या.
 
या दरम्यान त्यांनी असंख्य लोकांना अनुयायी बनवलं. या अनुयायांसाठी त्यांनी चार दिशांना चार मठांची स्थापना केली.
 
पूर्वेला ओडिशाच्या पुरीमध्ये वर्धन मठ, पश्चिमेला द्वारिकेतील शारदा मठ, दक्षिणेत म्हैसूरमधील श्रृंगेरी मठ आणि उत्तरेत ज्योतिर्मठ म्हणजे जोशीमठ. 
जोशीमठानंतर बद्रीनाथमध्ये श्री नारायणाच्या उध्वस्त झालेल्या मंदिराच्या पुनर्निर्माणाचं काम पूर्ण केल्यानंतर ते केदारनाथला गेले. त्याठिकाणी वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 
 
आदि शंकराचार्यांना मिळालं दिव्य ज्ञान 
जोशीमठाचं ऐतिहासिक महत्त्व आणखी एका गोष्टीमुळं आहे. आधुनिक हिंदु धर्माचे सर्वांत महान धर्मगुरु समजले जाणारे आदि शंकराचार्य यांनी याठिकाणी एका झाडाखाली साधना करत दिव्य ज्ञान प्राप्त केलं होतं. त्यामुळंच याला ज्योतिर्धाम म्हटलं गेलं.
 
हा विशाल वृक्ष आजही फुला-फळांनी बहरलेला पाहायला मिळतो. त्याला कल्पवृक्ष हे नाव देण्यात आलंय. 
 
सध्या या मंदिराला लागून असलेलं मंदिरही पडलं असून शंकराचार्यांनी ज्या गुहेत साधना केल्याचं सांगितलं जातं ती गुहादेखील पूर्णपणे नष्ट झालीय. 
 
जोशीमठासंदर्भात अनेक धार्मिक मान्यता प्रचलित आहेत. इथं नृसिंहाचं मंदिर असून, बाल प्रल्हादानं इथंच तपश्चर्या केली होती, असं म्हणतात. 
 
अनेक देवांच्या मंदिरांशिवाय इथं ब्रह्मा, विष्णू, शिव, गणेश, भृंगी, ऋषी, सूर्य आणि प्रह्लाद अशा अनेकांच्या नावांची कुंडंदेखील आहेत.
 
या सर्वांमुळं डोंगराळ भागात वसलेल्या या लहानशा गावाला देशाच्या धार्मिक नकाशावर महत्त्वाचं स्थान प्राप्त झालंय. 
 
कवितेतील जोशीमठ 
टिहरी गढवालमध्ये जन्मलेले समकालीन कवी आणि पत्रकार शिवप्रसाद जोशी यांनी 'जोशीमठ के पहाड' ही कविता लिहिली आहे : कुमाऊं-गढवालशी कसं जोडलं गेलं जोशीमठ कुमाऊं-गढवालच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा संबंध या सुंदर शहराशी आहे.
 
हिमालयाच्या या भूमीवर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या कत्युरी शासकांची पहिली राजधानी हीच होती. त्यालाच ज्योतिर्धाम म्हटलं जात होतं. 
 
कत्युरी सम्राट श्री वासुदेव गिरिराज चक्र चुडामणी उर्फ राजा वासुदेव यांनी इथं त्यांचं सत्ताकेंद्र तयार केलं होतं. 
 
एटकिन्सनच्या प्रसिद्ध हिमालयन गॅझेटियरमध्ये सर एचएम एलियट यांच्या दाखल्यानं फारशी इतिहासकार राशिद अल-दीन हमदानी यांच्या 'जमी-उल तवारीख' या ग्रंथाचा उल्लेख करत कत्युरी राजा वासुदेवबाबत लिहिलं आहे.
 
जोशीमठमध्ये तोच कत्युरी साम्राज्याचा संस्थापक होता, असं त्यात म्हटलंय. कालांतरानं ही राजधानी, कुमाऊँजवळच्या बैजनाथला हलवण्यात आली. 
 
कत्युरांची राजधानी कशी बदलली 
कत्यूरांची राजधानी जोशीमठहून बैजनाथला हलवण्यामागं काय कारण असावं, याबाबत एक कथा किंवा अख्यायिका प्रचलित आहे.
 
राजा वासुदेव यांचा वंशज असलेला एक राजा शिकारीसाठी गेला होता.
 
त्यांच्या अनुपस्थितीत मानवाच्या रुपात भगवान नृसिंह त्यांच्या महालात भिक्षा मागण्यासाठी आले. 
 
राणीनं त्यांचा आदर-सत्कार केला आणि त्यांना भोजनानंतर आराम करण्यासाठी राजाच्या पलंगावर झोपवलं.
 
राजा परतला तेव्हा त्यानं त्याच्या पलंगावर दुसरं कोणीतरी झोपल्याचं पाहिलं आणि तो रागानं लालबुंद झाला. त्यानं तलवारीनं नृसिंहाच्या हातावर वार केला. 
हातावर जखम झाली पण त्यातून रक्ताऐवजी दूध वाहू लागलं. राजानं घाबरून राणीला बोलावलं, तिनं त्यांच्या घरी आलेला भिक्षु हा साधा व्यक्ती नसून साक्षात देवाचा अवतार असल्याचं म्हटलं.
 
राजानं क्षमा मागितली आणि आपल्या गुन्ह्यासाठी शिक्षा द्यावी असा आग्रह नृसिंहांकडे धरला. 
 
नृसिंहांनी राजाला म्हटलं की, या कृत्यासाठी त्यांना ज्योतिर्धाम सोडून त्यांची राजधानी कत्यूर खोऱ्यात म्हणजे बैजनाथला न्यावी लागेल. 
 
"त्याठिकाणच्या मंदिरात माझी जी मूर्ती असेल तिच्या हातावरही अशाच जखमेचा व्रण असेल. ज्यादिवशी माझी मूर्ती नष्ट होईल आणि तिचा हात तुटून पडेल, त्यादिवशी तुझं साम्राज्यदेखील नष्ट होईल. त्यानंतर जगातील राजांच्या यादीत तुझ्या वंशाचं नाव राहणार नाही", असंही नृसिंहांनी म्हणाल्याचं सांगितलं जातं. 
 
त्यानंतर नृसिंह अदृश्य झाले आणि राजाला पुन्हा कधीही दिसले नाही.
 
पण त्यांच्या सूचनेचा आदर करत राजाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे वर्तन केले. 
 
आदि शंकराचार्यांनी घेतले नृसिंहाचे स्थान 
या कथेच्या दुसऱ्या भागामध्ये नृसिंहाचं स्थान आदि शंकराचार्य घेतात. त्यांच्याबरोबर झालेल्या धार्मिक वादांमुळं कत्युरी राजधानी जोशीमठमधून हलवण्यात आली होती. 
 
एटकिन्सनच्या गॅझेटियरमध्ये उल्लेख असलेल्या या कथेच्या दुसऱ्या भागाबाबत पुढं असाही अंदाज वर्तवण्यात आलाय की, आदि शंकराचार्यांनी जोशीमठमध्ये ज्योतिर्लिंगाची स्थापना केल्यानंतर ब्राह्मण आणि बौद्ध यांच्यात वर्चस्व प्रस्थापित करण्याची स्पर्धा सुरू होती.
 
त्यादरम्यान 'सद्यः-प्रस्फुटित शैवमत' च्या अनुयायांनी दोघांचा पराभव केला आणि जनतेमध्ये त्यांचं धार्मिक श्रेष्ठत्व सिद्ध केलं. 
जोशीमठच्या मंदिरात ठेवलेली काळ्या स्फटिकापासून तयार केलेल्या नृसिंहाच्या मूर्तीचा डावा हात दरवर्षी कमकुवत होत असल्याचं म्हटलं जातं. 
 
पौराणिक कथेमध्ये कत्युरी राजाला मिळालेल्या अभिशापानुसार असं म्हटलं जातं की, स्वतः भगवान विष्णूंनी सांगितलं होतं, "ज्या दिवशी मूर्तीचा हात पूर्णपणे छिन्न विछिन्न होईल, त्यादिवशी बद्रीनाथ धामचा रस्ता कायमचा बंद होईल. कारण त्यावेळी नर आणि नारायण पर्वत एकमेकांमध्ये विलीन होतील आणि भीषण असे भूस्खलन होईल." 
 
त्यानंतर बद्रीनाथचं मंदिर जोशीमठच्या पुढं भविष्य बद्री नावाच्या ठिकाणी स्थलांतरीत करावं लागलं.
 
महत्त्वाचा मार्ग 
तिबेटपासून जवळ असल्यानं याचं लष्करी महत्त्व ओळखून स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनं इथं भरपूर लष्कर आणि निमलष्करी दलांच्या तुकड्या तैनात केल्या. 
 
त्यात सर्वात मोठं नाव आहे गढवाल स्काउट्सचं.
 
गढवाल रायफल्समधील एक बटालियन म्हणून तयार केलेली गढवाल स्काउट्स ही एक एलिट इन्फन्ट्री बटालियन आहे.
 
दीर्घ पल्ल्यापर्यंतची निगराणी आणि उंच ठिकाणी युद्ध करण्याचं कौशल्य त्यांना अवगत आहे. देशातील सर्वांत वैभवशाली अशा लष्करी संपत्तीमध्ये समावेश होणाऱ्या या बटालियनचं मुख्यालय कायमस्वरुपी जोशीमठमध्येच आहे. 
 
2011 च्या जनगणनेनुसार जोशीमठची लोकसंख्या 17 हजार एवढी होती.
 
सैन्याच्या सर्व गटांच्या तुकड्यांमधील आकडा मोजता हा एकूण आकडा साधारणपणे 50 हजारांच्या जवळपास जातो. मुकेश शाह जोशीमठमध्ये व्यवसाय करतात.
या शहरातील त्यांची सध्याची चौथी पिढी आहे. त्यांच्या मते, बद्रीनाथच्या मार्गावर असल्यानं जोशीमठमध्ये व्यवसायाच्या प्रचंड संधी होत्या, त्यामुळं त्यांच्या आजोबांनी याठिकाणी येऊन स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 
 
जवळपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती व्हायची. त्यात बटाटा, राजमा, राजगिरा, उगल आणि कुटू यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जायचं. 
 
उत्तम दर्जा असलेल्या या सर्व गोष्टींना अगदी दूरवरून मोठी मागणी असायची. मुकेश शाह यांच्या कुटुंबानंही सुरुवातीला हेच काम केलं. 
 
सध्या ते हार्डवेअर आणि हॉटेल व्यवसायात आहेत. या कारणांमुळं जोशीमठनं डोंगराळ भागातील मूळ रहिवाशांशिवाय इतरही अनेकांना इथं स्थायिक होण्यासाठी आकर्षित केलं. 
 
सर्व प्रकारची मानवी कौशल्यं आणि श्रम करणारे मजूर आणि कारागिरही याठिकाणी स्थायिक झालेत. 
 
कठोर टेकड्या नव्हे, वाळू, माती आणि दगड-धोंडे 
शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या मते ज्या उताराच्या भागावर हे ऐतिहासिक शहर वसलेलं आहे, तो भाग एका अत्यंत प्राचीन भूस्खलनामुळं निर्माण झालेल्या ढिगाऱ्यापासून तयार झाला आहे. 
 
त्याचा अर्थ म्हणजे, ज्या भूमीवर हे शहर वसलंय त्याच्या बरोबर खालच्या थरामध्ये कठोर टेकड्या नसून वाळू, माती आणि दगड-धोंडेच आहेत.
 
अशा भूमीवर जास्त वजन वाढू लागल्यास ती खचू लागले म्हणजे तिथं भूस्खलन सुरू होतं. 
सुमारे 50 वर्षांपूर्वी गढवालचे तत्कालिन आयुक्त महेशचंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या एका समितीनं 1976 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता.
 
त्यात त्यांनी इशारा दिला होता की, जोशीमठच्या परिसरात अनियोजित विकास झाला तर त्याचे गंभीर नैसर्गिक परिणाम समोर येऊ शकतात. 
 
शिवप्रसाद जोशींनी जोशीमठच्या संदर्भातील त्यांच्या कवितेचा शेवट खालीलप्रमाणे केलाय : 
 
"लोग कहते हैं 
 
दुनिया का अंत इस तरह होगा कि 
 
नीति और माणा के पहाड़ चिपक जाएंगे 
 
अलकनंदा गुम हो जाएगी बर्फ़ उड़ जाएगी
 
 हड़बड़ा कर उठेगी
 
सुंदरी साधु का ध्यान टूट जाएगा 
 
हाथी सहसा चल देगा अपने रास्ते."
 
Published By - Priya Dixit