गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जुलै 2022 (07:50 IST)

यांनी केली "सरल वास्तू" फेम गुरुजींची हत्या

chandrashekhar guruji
सरल वास्तू फेम चंद्रशेखर गुरुजी यांची मंगळवारी सकाळी कर्नाटकातील हुबळी येथील एका हॉटेलमध्ये धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणातील दोन आरोपींना काही तासांतच पोलिसांनी अटक केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथून आरोपींना अटक करण्यात आली असून ते गुरुजींचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड अशी हल्लेखोरांची नावे आहेत.

दोन्ही आरोपी चंद्रशेखर गुरुजी यांच्याकडे 2019 पासून काम करत होते. दरम्यान गुरुजींनी पुढाकार घेत वनजाक्षी आणि मंजुनाथ यांचा विवाह करून दिला होता, यानंतर दोघांना राहण्यासाठी एक प्लॅट देखील दिला. मात्र काही दिवसांनी दोघांनी गुरुजींकडील काम सोडले. यावेळी काम सोडल्याने गुरुजींनी दोघांकडे प्लॅट परत करण्याचा तगादा लावला होता. त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे. चंद्रशेखर गुरुजींच्या हत्येनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरात नाकाबंदी सुरु केली, यावेळी एसीपी विनोद यांच्या पथकाने हल्लेखोरांना रामदुर्ग येथून ताब्यात घेतले.
 
चंद्रशेखर गुरुजी यांची आज दुपारी 12 च्या सुमारास कर्नाटकच्या हुबळी येथील हॉटेलमध्ये हत्या झाली. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर गुरुजींना कोणीतरी फोन करुन हॉटेलच्या लॉबीमध्ये येण्यास सांगितले होते. यावेळी लॉबीमधील दोघांपैकी एक जण आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकला आणि एकाने चाकूने वार करण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांनी धारदार शस्त्राने गुरुजींवर सपासप वार केले आणि तिथून पळून गेले. त्यांनंतर तात्काळ गुरुजींना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी विजय नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुरुजींच्या कुटुंबीयांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.
 
गुरुजींच्या कुटुंबातील एका मुलाचा 3 दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने ते हुबळीला आले होते. यावेळी चंद्रशेखर गुरुजी  शहरातील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये व्यवसायिक कामानिमित्त कोणाला तरी भेटण्यासाठी थांबले होते. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पोहचून त्यांची चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हुबळीचे पोलीस आयुक्त लाभू राम घटनास्थळी धाव घेत आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देत प्रकरणाचा तपास सुरु केला.