रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (21:03 IST)

मडकईकर यांचा उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा जाहीर,प्रचारातसुद्धा सहभागी होणार

काँग्रेसचे पणजीची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले माजी महापौर उदय मडकईकर यांनी उत्पल पर्रिकर यांना निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी याविषयीची अधिकृत घोषणा केली. उत्पल पर्रिकर हे पणजीची निवडणूक अपक्ष लढवणार आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होऊ नये, यासाठीच उत्पल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पल यांना पाठिंबा देतानाच त्यांच्यासोबत प्रचारातसुद्धा सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 
मडकईकर म्हणाले की, उत्पल यांना निवडणुकीत पाठिंबा द्यावा की तृणमूल काँग्रेसची ऑफर स्वीकारून त्यांच्या उमेदवारीवरून निवडणूक लढवावी, असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला होता. मात्र, त्यापैकी उत्पल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून घेतला आहे. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणे हा उद्देश ठेवूनच उत्पल यांना पाठिंबा दर्शवला आहे. जर मी अपक्ष किंवा अन्य पक्षांतर्फे निवडणूक लढवली, तर मतांचे विभाजन होईल, जे अयोग्य ठरणार आहे. भाजप उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना निवडणुकीत केवळ उत्पलच टक्कर देऊ शकतात. ते नक्कीच विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.