मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 2 मार्च 2020 (10:00 IST)

हनुमान गढीचे महंत राजू दास यांची धमकी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी माहिती दिली होती. येत्या 7 मार्च रोजी उद्धव ठाकरे शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार आहेत. ते 7 मार्च रोजी अयोध्येत दुपारी श्रीरामाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती करणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंदुत्वाच्या मुद्दयावरून शिवसेनेची कोंडी होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका मवाळ केल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक संत-मंहतात नाराजीचा सूर पसरला आहे.
 
हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवत 'उद्धव ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही,' अशी धमकी दिली आहे.
 
उद्धव ठाकरे येत्या 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे या दिवसाचे निमित्त साधून शिवसेना अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरील @rajudasayodhya या टि्वटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये महंत राजू दास यांनी सांगितलं आहे की, मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देणारी शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावरून भरकटली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही. विशेष म्हणजे या ट्विट अकाऊंटवरून पोस्ट करताना महंत राजू दास यांनी आपला फोटोही शेअर केला आहे.