1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 5 मे 2018 (11:46 IST)

महाराष्ट्रासह 16 राज्यांना वादळाचा धोका

mansoon in maharashatra
उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील वादळ ओसरले असले तरी धोका अजून टळलेला नाही. उत्तर प्रदेश, राजस्थान, विदर्भ, दिल्ली, उत्तराखंड आणि बिहारसह 16 राज्यांमध्ये वादळाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला असून आगामी पाच दिवस सतर्क राहण्याचा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. तसेच राजस्थानमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
 
राजस्थान आणि उत्तर प्रदेशात आलेल्या वादळात 129 लोक ठार झाले होते. त्यामुळे हवामान खात्याने या दोन्ही राज्यांना 48 तास सतर्क राहण्याचे आदेश आधीच दिलेले असतानाच राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने हवामान खात्याच्या हवाल्याने देशात पाच दिवसांचा नवा अ‍ॅलर्ट जारी केला आहे. या अ‍ॅलर्टनुसार दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, बिहार, झारखंड, तेलंगणा, विदर्भ, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिशा आदी ठिकाणी वादळ येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि दक्षिण कर्नाटकमध्ये अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. या सोळाही राज्यांमध्ये पाच दिवस म्हणजे 8 मेपर्यंत हवामान खराब राहणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. दरम्यान, वादळाच्या शक्यतेने उत्तर प्रदेश सरकारने सर्व जिल्हाधिकार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.