शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (16:03 IST)

आसाम-मिझोरम सीमा संघर्षात मराठी IPS अधिकारी वैभव निंबाळकर जखमी

आसाम मिझोरम सीमा संघर्षात महाराष्ट्रातील IPS अधिकारी वैभव निंबाळकर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गोळी लागली असून सध्या ते आयसीयू मध्ये दाखल झाले आहेत. आसाम सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. वैभव निंबाळकर 2009 च्या बॅचचे आसाम मेघालय बॅचचे IPS अधिकारी आहेत. सध्ये ते काचर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
 
काल (26 जुलै) झालेल्या संघर्षात काचर चे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वनाधिकारी असे अनेक ज्येष्ठ अधिकारी संघर्षस्थळी गेले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची नासधूस करण्यात आली होती आणि गोळीबारात निंबाळकर जखमी झाले आहेत.
 
आसाम-मिझोरम सीमेवर काय झालं?
आसाम आणि मिझोरामच्या सीमेवर आसाम पोलिसांच्या 6 जवानांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या सीमेचं रक्षण करताना या जवानांचा मृत्यू झाला. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली.
 
सरमा यांनी ट्विटरवर म्हटलं, "मी अत्यंत दु:खात ही माहिती सांगत आहे की, आसाम पोलिसांच्या 6 जवानांनी आसाम-मिझोराम सीमेवर राज्याच्या सीमेचं रक्षण करताना बलिदान दिलं आहे. या जवानांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो."
 
आसाम आणि मिझोरामच्या सीमेवर सोमवारी सुरक्षा दल आणि सामान्य नागरिकांमध्ये हिंसा झाल्याची बातमी आली होती. तिथं गोळीबार झाल्याचंही यात सांगण्यात आलं होतं.
 
या मुद्द्यावरून आसामचे मुख्यमंत्री सरमा आणि मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी एक दुसऱ्यावर आरोप केले होते. त्यानंतर एकमेकांबरोबर चर्चा झाल्याचं दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.
 
या बातम्या येत असताना वृत्तसंस्था पीटीआयनं माहिती दिली की, गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना शांतता कायम राखण्यास सांगितलं आहे. सरमा आणि जोरामथांगा यांनी अमित शाह यांना याप्रकरणात दखल देण्याची विनंती केली होती.
 
दोन दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी पूर्वेकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली होती. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी सोमवारी ट्वीट करत या मीटिंगचा उल्लेख केला होता.
 
त्यांनी लिहिलं होतं, "प्रिय हिमंताजी, अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या सौहार्दपूर्ण बैठकीनंतरही आसाम पोलिसांच्या 2 तुकड्या आणि सामान्य नागरिकांनी आज मिझोरामच्या वॅरेनगटे ऑटो रिक्षा स्टँडवर नागरिकांवर लाठीहल्ला केला आणि अश्रुधूर फवारला. इतकंच काय तर तो सीआरपीएफ आणि मिझोराम पोलिसांवरही फवारण्यात आला."
 
जोरामथांगा यांनी हे ट्वीट सरमा यांना संबोधून केलं होतं. ते सरमा यांनी केलेल्या ट्वीटला उत्तर देत होते.
 
सरमा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं, "आदरणीय जोरामथांगाजी, जोपर्यंत आम्ही आमच्या पोस्टवरून मागे हटत नाही, तोपर्यंत आमचे नागरिक ऐकणार नाहीत, हिंसाही थांबवणार नाहीत, असं कोलासिबचे (मिझोराम) पोलीस अधीक्षक आम्हाला सांगत आहेत. यास्थितीत आम्ही सरकार कसं चालवू शकतो? यात तुम्ही लवकरच हस्तक्षेप कराल, अशी आशा आहे."