1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नितीशकुमार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देशाच्या राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, केवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यातील भेट असे तिचे स्वरूप असल्याचे म्हणत नितीश यांनी ही भेट राजकीय नसल्याचे ठसवण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमधील नियमित चर्चा असे मोदी आणि माझ्या भेटीचे स्वरूप होते. जेडीयूचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना भेटलो नाही. आमच्यातील भेट राजकीय नव्हती. प्रसारमाध्यमे या भेटीतून अधिकचा अर्थ काढण्याचा प्रयत्न का करत आहेत, अशी विचारणा नितीश यांनी पत्रकारांशी बोलताना केली. भारत दौऱ्यावर आलेले मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या सन्मानार्थ मोदींनी भोजन समारंभाचे आयोजन केले होते. मोदींनी त्यात सहभागी होण्याचे निमंत्रण नितीश यांना दिले. ते स्वीकारून नितीश उपस्थितही राहिले. बिहारचे मॉरिशसशी भावनिक नाते आहे. त्या देशातील अनेक लोक बिहारी वंशाचे आहेत. त्यामुळेच बिहारचा मुख्यमंत्री असल्याने मोदींनी मला निमंत्रण दिले आणि ते स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे .