कोरोना प्रतिबंधक उपायांचं काटेकोर पालन करत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून होणार सुरुवात
हे अधिवेशन येत्या एक ऑक्टोबरपर्यंत चालणार असून सध्या सुरू असलेल्या कोविड-19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन सकाळी 09 ते दुपारी 11 आणि दुपारी 03 ते संध्याकाळी 07 वाजेपर्यंत अशा दोन सत्रांमध्ये पार पडेल. अधिवेशनाचा पहिला दिवस वगळता राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात तर लोकसभेचं कामकाज संध्याकाळच्या सत्रात होईल. या अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास असणार नाही तसंच खासगी सदस्यांची विधेयकं विचारासाठी सभागृहात घेतली जाणार नाहीत.
शून्य प्रहरसुद्धा मर्यादित कालावधीचा असेल. याशिवाय सभागृहांचं कामकाज सुरू असताना मधली सुट्टी नसेल. तसंच शनिवारी आणि रविवारीही दोन्ही सभागृहांचं कामकाज होईल, असं दोन्ही सभागृहांच्यासचिवांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
अधिवेशन काळात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं पालन केलं जाईल. यामध्ये सर्व खासदारांची चाचणी, तसंच सुरक्षित अंतराच्या नियमांचा समावेश आहे. कामकाज सुरू असताना सदस्यांमध्ये सुरक्षित अंतर रहावं यासाठी त्यांची दोन्ही सदनांच्या सभागृहांसोबतच दीर्घीकांमध्येही आसनव्यवस्था केली जाणार आहे. संसद भवनात प्रवेश करण्यापूर्वी खासदारांसह इतर प्रत्येक व्यक्तीला अधिवेशनापूर्वी किमान 72 तास अगोदर आरटी –पीसीआर चाचणी करून घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.